ठाणे : भारतामध्ये ‘जेएन १’ या ओमायक्राॅनच्या नव्या उपप्रकाराचा विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून येत असतानाच, ठाणे शहरात गेल्या २० दिवसांत नऊ करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या रुग्णांच्या नमुने तपासणीचे अहवाल अद्याप पालिकेला प्राप्त झालेले नसल्यामुळे त्यांना नव्या उपप्रकाराची लागण झाले आहे की नाही, हे समजू शकलेले नाही. शहरात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेण्याबरोबरच करोना चाचण्या वाढविण्याची तयारी सुरू केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून करोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. यंदाच्या मार्च महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात करोनाचे रुग्ण आढळून आले होते. ऑगस्ट महिन्यानंतर मात्र करोना संसर्ग आटोक्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून शहरात करोनाचा रुग्ण आढळून येत नसल्याने पालिका प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला होता. परंतु डिसेंबर महिन्यात करोना आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या २० दिवसांत शहरात ९ करोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी केवळ एका रुग्णांची प्रकृती चिताजनक असून तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. उर्वरित रुग्णांची गृह विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत.

हेही वाचा >>> ठाकुर्लीत वर्दळीच्या रस्त्यावर महापालिकेचे ‘स्मार्ट पार्किंग’ ; दूरसंवेदन पध्दतीसाठी लाखोंची उधळपट्टी

शहरात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार शहरातील आरोग्य केंद्र आणि कळवा रुग्णालयात संशयित रुग्णांची करोना चाचणी करण्यात येते. दिवसाला २०० चाचण्या करण्यात येत असून त्यात १२० शीघ्र प्रतिजन तर ८ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येतात. परंतु करोनाची लक्षणे असणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. तसेच करोनाबाधित रुग्ण उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्यात आलेला आहे. त्याठिकाणी उपचारासाठी एकूण २० खाटा आहेत. त्यातील पाच खाटा अतिदक्षता विभागातील आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>> डोंबिवली मोठागाव खाडीत बेकायदा रेती उपसा- दिवस-रात्र सक्शन पंपाची धडधड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दर महिन्याला सुमारे २५ रुग्णांचे नमुने पुणे येथील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविण्यात येतात. डिसेंबर महिन्यात एकूण ९ रुग्ण आढळून आलेले असून त्यापैकी ७ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्याचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना नव्या उपप्रकाराची लागण झाले आहे की नाही, हे समजू शकलेले नाही, अशी माहिती आरोग्य विभागाक़डून देण्यात आली. ठाणे शहरात मंगळवारी करोनाबाधित रुग्ण आढळून आलेली आहे ती मुळची बिहार राज्यातील आहे. पतीसोबत ती म्हाड येथे आली होती. तेथून ती १५ दिवसांपुर्वी ठाण्यात आली होती. तिला ताप, दमा आणि सर्दी असा त्रास होता. तिचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आलेला असून तिच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाती विशेष कक्षातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.