Thane News : ठाणे : ईद-ए-मिलाद निमित्ताने मुस्लिम समाजाकडून मिरवणूका काढल्या जाणार आहेत. या कालावधीत वाहनांचा भार वाढून कोंडी किंवा अपघात होऊ नये यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी मोठे वाहतुक बदल लागू केले आहेत.
ईद- ए- मिलाद निमित्ताने भिवंडी शहरात मिरवणूका काढल्या जातात. तसेच मुस्लिम समाज देखील मोठ्याप्रमाणात मिरवणूकांमध्ये सहभागी असतात. ठाणे पोलिसांनी ई-ए- मिलाद निमित्ताने अर्थात सोमवारी दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत वाहतुक बदलाची अधिसूचना काढली आहे.
काय आहेत वाहतुक बदल
- वाडा येथून भिवंडी शहराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने राष्ट्रीय महामार्ग ८ येथून किंवा मुंबई महानगर जलवाहिनी मार्गे वाहतुक करतील.
- वाडा येथून नदीनाका मार्गे भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळ फाटा येथे प्रवेशबंदी असेल. हलकी वाहने पारोळ फाटा येथून उजवे वळण घेऊन खोणीगाव, तळवळी फाटा, कांबा रोड, वसई रोड मार्गे करावली किंवा विश्वभारती फाटा येथून गोरसईगाव मार्गे वाहतुक करतील.
- वडपे तपासणी नाका येथून भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या बसगाड्यांसह इतर सर्व वाहनांना जांबोळी नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने धामणकरनाका जलवाहिनी येथे उजवे वळण घेऊन जलवाहिनी मार्गे वाडा किंवा त्यापुढे वाहतुक करु शकतील. तर बसगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाविंद्रा जकात नाका येथे उतरविले जाईल.
- ठाणे, कल्याण येथून जुना आग्रा रोड मार्गे वाडा आणि चाविंद्रा मार्गे मुंबई नाशिक महामार्गाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना बागेफिरदोस पेट्रोल पंप पुढे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने पेट्रोल पंप जवळून उजवे वळण घेऊन नागाव मार्गे वाहतुक करू शकतील.
- रांजनोली चौकातून भिवंडी शहरात वाहतुक करणाऱ्या राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसगाड्या, कल्याण महापालिकेच्या परिवहन सेवेच्या केडीएमटी बसगाड्या, जड-अवजड वाहने, रिक्षा, मध्यम व हलक्या वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेशबंदी असेल. जड-अवजड, मध्यम आणि हलकी वाहने रांजनोली नाका येथून वळसा घालून मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली नाका येथून अंजुरफाटा किंवा वसई रोड किंवा ओवळी खिंड येथून ओवळी गाव, ताडाळी जकात नाका, जलवाहिनी मार्गे वाहतुक करतील. तर एसटी, केडीएमटी, रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रांजनोली नाका येथे उतरविले जाईल.