ठाणे : एलजीबीटीक्यू समुहाचे अस्तित्व आणि हक्क याबाबत समाजात जागृकता निर्माण व्हावी तसेच समलैंगिक व्यक्तींना लग्न करण्याचा अधिकार मिळावा,या समूहातील व्यक्तींना अपराधांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे अशा विविध मुद्द्यांवर ठाण्यात शनिवारी ठाणे प्राइड फेस्टिवल या उपक्रमांतर्गत पहिल्यांदाच एलजीबीटीक्यू समुहाची रॅली निघाली. या रॅलीत एलजीबीटीक्यू समुहातील व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

समलैंगिक व्यक्तींना लग्नाचा अधिकारी मिळावा यासंदर्भात ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ते फक्त मनातून उमलतं’ ‘लग्न मुलाशी असो किंवा मुलीशी काय फरक पडतो लग्न हे लग्न आहे’ तसेच ‘एलजीबीटीक्यू समुह त्यांचे हक्क मागत आहे’ अशा विविध आशयाचे फलक हातात घेऊन हा समुह रॅलीत सहभागी झाला होता. ही रॅली नितीन कंपनी जंक्शन पासून ते मासुंदा तलावापर्यंत काढण्यात आली होती.

ठाणे शहरात पहिल्यांदाच एलजीबीटीक्यू समूहातील तरुण व्यक्तींनी एकत्रित येत स्वीकार : द रेनबो पॅरेंटस आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला. या समूहाचे अस्तित्व आणि हक्क याबाबत समाजात जागृकता निर्माण व्हावी, समलैंगिक व्यक्तींना लग्न करण्याचा अधिकार तसेच दत्तक अधिकार असे समान मानवी अधिकार प्राप्त व्हावे, समुहासोबत होणारे अपराधांबाबत जनजागृती निर्माण व्हावी. तसेच त्यांना अपराधांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि एचआयवी – एड्स सारख्या आजारांबाबत जनजागृती निर्माण व्हावी अशा विविध मुद्द्यांना धरुन ही रॅली काढण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा युवा मोर्चाचा एलजीबीटीक्यू रॅलीला विरोध

एलजीबीटीक्यू समुहाची रॅली मासुंदा तलाव येथील सेंट जॉन शाळेजवळ आली असता, त्याठिकाणी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या रॅलीला विरोध केला. आम्ही एलजीबीटीक्यू समुहाचा आदर करतो. परंतू, एकीकडे ठाणे शहरात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतीक आणि धार्मिक कार्यक्रम होत असताताना, दुसरीकडे एलजीबीटीक्यूच्या रॅलीत आपले हक्क मांडताना काही व्यक्तींनी विभत्स पद्धतीचे कपडे परिधान केले होते. या वागणूकीला आमचा विरोध असल्याचे मत भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यानंतर, ही रॅली सेंट जॉन शाळेजवळ स्थगित करण्यात आली.