ठाणे : दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण. मात्र मराठवाड्यातील अनेक भागात गेल्या महिन्यातील महापुरामुळे अनेक कुटुंबांचा दिवाळीचा आनंद हरवला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शेळगाव या गावात असलेल्या माणिकबाबा विद्यालयावर या पुराचा मोठा परिणाम झाला असून शाळेच्या इमारतीसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य, पुस्तके आणि वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पूरग्रस्तांसाठी ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्टच्यावतीने दिवाळी भेट दिली जाणार आहे.

सरस्वती मंदिर ट्रस्ट ही नोंदणीकृत शैक्षणिक संस्था आहे. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकातील अभ्यासक्रमाप्रमाणेच व्यवहार ज्ञान यावे यासाठी आर्थिक नियोजन शिकवले जातात. तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी भाज्या, रंग ओळख, आकार ओळख यासाठी साक्षरतेची जत्रा उपक्रम राबवला जातो. त्याचप्रमाणे शेतीच्या कामांचे ज्ञान मिळावे यासाठी देखील पेरणी ते कापणी हा उपक्रम राबवण्यात येतो. अशा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सरस्वती शाळा काम करत असते. अशातच सामाजिक भान जपत ट्रस्टच्यावतीने ठाण्यातील इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या सर्व विभागांतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक एकत्र येऊन या पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी “दिवाळी भेट” स्वरूपात खाऊ आणि शैक्षणिक साहित्य पाठविणार आहेत.

या उपक्रमात संस्थेचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच समाजातील अनेक हितचिंतक उत्साहाने सहभागी होत आहेत. संस्थेच्यावतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शक्य तितक्या प्रमाणात या मदत मोहिमेत सहभागी व्हावे आणि मराठवाड्यातील या विद्यार्थ्यांसाठी आपला हात पुढे करावा.

या मदतीसंदर्भात अधिक माहिती किंवा सहभागासाठी इच्छुकांनी संस्थेच्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाईल: ९१३७२९०४८६

संपर्क वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ४.००

ठाण्यातून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी झालेली मदत

आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मोफत औषध पुरवठा करण्यात आला होता. यासाठी औषधांनी भरलेला एक मोठा टेम्पो पुणे येथून पूरग्रस्त भागाकडे रवाना झाले होते.

‘विद्या -ज्योती’ प्रकल्प

ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, टीजेएसबी सहकारी बँक आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्यावतीने ‘विद्या -ज्योती’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य मोफत पुरविण्यात येणार आहे. यात वह्या, पुस्तके, गणवेश, दप्तर, लेखन साहित्य यांचा समावेश असलेले “शैक्षणिक साहित्य संच” प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. याशिवाय, स्थानिक पातळीवरील गरजेनुसार अन्य शालेय वस्तू देखील पुरवल्या जातील.