ठाणे : श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहार करत नाहीत. या महिन्यात अनेक जण उपवास करतात. यामुळे श्रावण महिना सुरू होण्याआधी येणाऱ्या आषाढ अमावस्येला अनेकजण ‘गटारी’ साजरी करतात. मटण, चिकन, मासे अशा मांसाहारी पदार्थांवर ताव मारण्याबरोबरच मद्याचे सेवन केले जाते. या पार्टीनंतर अनेकजण मद्याच्या नशेत वाहन चालवित असून यामुळे अपघातांचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी केलेल्या तपासणीत १११ वाहनचालकांना गटारी पार्टी करणे महागात पडले आहे.
श्रावण महिन्यात महिनाभर मांसाहार करण्यास मिळणार नाही म्हणून अनेक जण श्रावण महिना सुरू होण्याआधी येणाऱ्या आषाढ आमवस्येला गटारी साजरी करतात. यंदा २३ जुलै रोजी आषाढ आमवस्येनिमित्ताने अनेकजणांनी गटारी साजरी केली. अनेकांनी शेतघरावर ही पार्टी साजरी केली. काहींनी घरीच पार्टी केली. मटण, चिकन, मासे अशा मांसाहारी पदार्थांवर ताव मारला जातो. यामुळे मटण, चिकन आणि मासे दरात मोठी वाढ झाली होती. दरवाढ झाली असली तरी त्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांवर गर्दी केली होती.
तसेच मांसाहारी पदार्थाबरोबरच मद्याचे सेवन केले जाते. यामुळे मद्य विक्रीच्या दुकानांबाहेरही एक दिवस आधीपासूनच गर्दी दिसून येत होती. गटारी पार्टी साजरी केल्यानंतर अनेकजण मद्याच्या नशेत वाहन चालवितात. यामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालण्याबरोबरच इतरांचे जीवही धोक्यात घालतात. असे प्रकार घडू नयेत यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून दरवर्षी नाक्यानाक्यांवर पोलिसांची पथके तैनात करून वाहनचालकांची मद्यपी तपासणी करण्यात येते.
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर या शहरांमध्ये ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी मद्यपी चालकांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली. यासाठी या शहरातील नाक्यानाक्यांवर पथके तैनात करण्यात आली होती. ही पथके श्वास विश्लेषक यंत्राद्वारे वाहनचालकांची तपासणी करीत होती. या कारवाईत एकूण १११ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये ठाणे शहर परिमंडळात २२, वागळे परिमंडळात २३, भिवंडी परिमंडळात ८, कल्याण परिमंडळात २३ आणि उल्हासनगर परिमंडळात ३५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान, चालकांचे वाहन परवाने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या चालकांना आता न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस त्यांच्यावर पुढील कारवाई करणार आहेत. त्यामुळे गटारीनिमित्ताने मद्यपान करून वाहन चालविणे चालकांना महागात पडल्याचे दिसून येत आहे.