ठाणे – कौंटुंबिक हिंसा, छळ, मारहाण अशा विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या महिलांचे मानसिक स्वास्थ बिघडते. अशावेळी महिलांना मानसिक उपचाराची सर्वाधिक गरज असते. महिलांच्या या मानसिक परिस्थितीची दखल घेत, ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत ग्रामीण भागात समुपदेशन केंद्र गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. या केंद्रांवर आतापर्यंत ५०० हून अधिक महिलांनी भेट दिली असून त्यांच्या समस्या सोडविण्यास जिल्हा परिषदेला यश आले आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात महिलांसाठी विशेष योजना अंतर्गत महिलांसाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात पाच समुपदेशन केंद्रांवर महिलांचे समुपदेश केले जात आहे. समूपदेशन करण्यापूर्वी नियुक्त कर्मचारी आणि अधिकारी पीडित महिलांची समस्या जाणून घेतात. त्यानंतर, तज्ज्ञ व्यक्तीकडून महिलांच्या समुपदेशनासह त्यांच्या समस्येवर कायदेशीर मदत, मानसोपचार तज्ज्ञांची मदत, पोलिसांची मदत मिळवून दिली जाते. जिल्ह्यात ठाणे, कल्याण, शहापुर, अंबरनाथ आणि मुरबाड याठिकाणी हे समुपदेश केंद्र आहेत. गेले पाच ते सहा महिन्यात या केंद्रावर ५८७ महिलांचे समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आली.

या समस्याग्रस्त महिलांची समुपदेशन केंद्राला भेट

पती पत्नी भांडण, सासु सुनेची भांडणे, हुंड्यावरुन भांडणे, व्यसनाधिनतेमुळे, संशयीवृत्तीमुळे, शारिरिक छळ, आर्थिक छळ, मानसिक छळ, लैंगिक शोषण, फसवणूक आणि समाजमाध्यमा मार्फत झालेली फसवणुक अशा विविध समस्या घेऊम महिला या समुपदेश केंद्रात आल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समुपदेश केंद्रावर असे केले जाते मार्गदर्शन

समुपदेशन केंद्रात येणाऱ्या प्रत्येक महिलेकडून तिच्या समस्येचा अर्ज लिहून घेतला जातो. एखाद्या महिलेस लिहीता वाचता येत नसेल तर, केंद्रावरील कर्मचारी तिची समस्या ऐकूण अर्ज लिहून घेतात. त्यानंतर, तिला कुटूंबातील कोणत्या व्यक्तीचा त्रास होतोय हे जाणून त्या व्यक्तीला केंद्रामार्फत पत्र पाठवून त्याचे म्हणणे मांडण्यास सांगितले जाते. पत्र पाठवूनही ती व्यक्ती केंद्रात भेट देण्यास आली नाही तर, त्या महिलेला कायद्याची मदत दिली जाते. अनेकदा पती-पत्नींमधील भांडणाचे प्रकार हे शुल्लक असतात. त्यासाठी दोघांचे म्हणणे ऐकूण त्यांना मार्गदर्शन केले जाते. दोघांचे भांडण मिटविण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यांचा सहमतीने त्यांना सहा महिन्याचा वेळ दिला जातो. याकाळात, त्यांच नात कसे सुरु आहे याकडे आमचे लक्ष असते. त्यामुळे एखादे प्रकरण सोडवायला कधी तरी सहा महिने तर, कधी दोन वर्षे देखील लागतात, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला फेडरेशन ठाणे समितीच्या समुपदेशक कशिष्मा जाधव यांनी दिली.