भावनिकतेचा पुरेपूर वापर होतो आणि रोजच्या जगण्याशी संबंध जोडला जातो म्हणून जाहिराती मनाला भावतात आणि त्या आवडतातही. काही ठिकाणी अतिशयोक्ती असली तरी त्या मनाला आनंद देत राहतात. पुराण काळात अश्वमेधाचा घोडा जाहिरातीचा एक प्रकार होता. १४ विद्या आणि ६४ कलांची महती सांगणारी जाहिरात ही १५ विद्या आणि ६५ वी कला आहे..या आणि अशासारख्या वेगवेगळ्या मुद्द्य़ांची पेरणी करत ठाणे परिसरातील नऊ स्पर्धकांनी बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या ठाणे विभागीय अंतिम फेरीत रंग भरले. ठाण्यातील शेठ एनकेटी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पनवेल येथील पिल्लई महाविद्यालयाच्या रिद्धी म्हात्रे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावित महाअंतिम फेरीत जागा पटकावली. 

सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले, रूईया महाविद्यालयाच्या मनीषा कर्पे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडीफाईस व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेचा ठाणे विभागीय अंतिम सोहळा अनुभवण्यासाठी यावेळी ठाणेकर श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. जनकल्याण सहकारी बॅंक आणि तन्वी हर्बल यांच्या मदतीने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल आणि अगदी अलिबागच्या महाविद्यालयातून वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने ठाण्यात आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवती शैली, वैचारिक मांडणी, विषयाचे गांभीर्य तितक्याच नर्मविनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यावेळी केला. ‘ओबामा आले..पुढे काय’, ‘संवाद माध्यमे आणि आम्ही’, ‘तुम्हाला जाहिराती आवडतात, कारण ‘.., मराठी अभिजात झाली, मग.’आणि ‘भारतीय पुराणातील वानगी’ या पाचही विषयांना या स्पर्धकांनी स्पर्श करून त्यातून आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला. ‘ओबामा आले..पुढे काय’ या विषयाची मांडणी करताना भारत-अमेरिकेच्या संबंधाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. ‘अतिथी देवो भव’ ही आपली संकल्पना असून ओबामा भारतामध्ये आल्यामुळे आणि त्यांच्या स्वागतामुळे भारतीयांच्या दैनंदिन जीवनात काहीच फरक पडलेला नाही. तर केवळ चर्चेसाठी एक नवा विषय मिळाला. या निमित्ताने आपण अमेरिकेच्या जवळ गेलो असलो तरी पूर्णपणे अमेरिकावादी होऊनही चालणार नाही. भारत अमेरिकेच्या कितीही जवळ गेला तरी भौगोलिकदृष्टय़ा असलेले एक हजारांचे अंतर मात्र कायमच राहणार आहे, अशी अमेरिका आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचा वेध या वेळी स्पर्धकांनी घेतला. ‘संवाद माध्यमे आणि आम्ही’या विषयाची मांडणी करताना तार यंत्रापासून पत्र, टीव्ही, रेडिओ, टेलिफोन आणि सध्याच्या फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून हरवला जाणारा संवादही अधोरेखित करण्याचा प्रयत्न स्पर्धकांनी केला. गौरवशाली इतिहास केवळ न्यूनगंड झाकण्यासाठी करून चालणार नाही तर त्यातून प्रेरणा घेण्याची गरज आहे. जाहिराती आवडण्याची कारणे सांगताना आठवणीतील जाहिराती उलगडण्याचा प्रयत्न स्पर्धकांनी केला. नऊ स्पर्धकांनी आपले विचार मांडल्यानंतर जमलेल्या रसिक प्रेक्षकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आवाजातील दुर्मीळ ध्वनिफीत ऐकवण्यात आली. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी जनकल्याण सहकारी बॅंकेचे मिलिंद देसाई, तन्वी हर्बलच्या मेधा मेहंदळे, एलआयसीच्या ऋता आजगावकर, परीक्षक धनश्री लेले, रूईया महाविद्यालयाच्या मनीषा कर्पे, इंडियन एक्स्प्रेसचे तरुण तिवाडी, सुब्रोतो घोष उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

ठाणे विभागातून प्रथम आले, याचा आनंद फार मोठा आहे. अंतिम फेरीत ठाण्याचे प्रतिनिधित्व जोरदारपणे करीन हा विश्वास आहे.
रिद्धी म्हात्रे (पिल्लाई महाविद्यालय, पनवेल) (प्रथम पारितोषिकविजेती)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लोकसत्ता’ने आयोजित केलेली ही स्पर्धा खऱ्या अर्थाने वैविध्यपूर्ण विषयांनी नटलेली होती. या स्पर्धेत सहभागी झालेले इतर स्पर्धक तितक्याच ताकदीचे आणि तयारीचे होते. किन्नरी जाधव (जोशी- बेडेकर महाविद्यालय, ठाणे) (द्वितीय पारितोषिकविजेती)
स्पर्धेत दिलेल्या एका विषयाप्रमाणेच लोकसत्तेने प्रत्यक्षात या स्पर्धेमार्फत वाचकांशी संवाद घडवून आणला याचेही कौतूक वाटते. धनश्री लेले यांच्यासारख्या वक्त्यांना ऐकायला मिळणे ही पर्वणी म्हणायला हवी. त्याबद्दलही लोकसत्ताला धन्यवाद द्यावेसे वाटतात.
– श्रेया केळकर (जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग) (तृतीय पारितोषिक विजेती)
विभागीय अंतिम
फेरीचे विजेते
रिद्धी म्हात्रे, प्रथम
किन्नरी जाधव, द्वितीय
श्रेया केळकर, तृतीय
मानसी जंगम, उत्तेजनार्थ
पूजा शृंगारपुरे, उत्तेजनार्थ