ठाणेः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहुर्त पुन्हा एकदा हुकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी ते आमणे या टप्प्याचे लोकार्पण १ मे रोजी होईल अशी चर्चा रंगली होती. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार अशीही चर्चा होती. गुरूवारी नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. मात्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण रखडल्याने चर्चांना उधाण आले आहे. आता नवा कोणता मुहुर्त या शेवटच्या टप्प्यासाठी दिला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटर टप्प्याचे काम आव्हानात्मक असल्याने यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा मोठा वेळ गेला. उंच डोंगर, खोल दऱ्या आणि आव्हानात्मक स्थितीत काम करण्यासाठी येथे मोठा वेळ गेला. त्यामुळे शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण अनेकदा पुढे ढकलले गेले. यापूर्वी विधानसभा निवडणुकांपूर्वी या महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला होईल अशी शक्यता होती. मात्र अनेक कामे प्रलंबित राहिल्याने लोकार्पण पुढे ढकलण्यात आले होते.

मार्च महिन्याच्या अखेरीस समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले होते. काही लहान मोठ्या गोष्टींची पूर्तता एप्रिल महिन्यात केली जात होती. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी अर्थात १ मे रोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. त्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने तयारीही सुरू केली होती. या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाचारण केले जाणार होते. मात्र १ मे रोजी या मार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होऊ शकले नाही. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्याच एका कार्यक्रमासाठी बीकेसी येथे दिवसभरासाठी आले होते. त्यामुळे आता समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी नवा कोणता मुहुर्त मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रवाशांत नाराजी

सध्या इतगपुरी ते नागपूर असा समृद्धी महामार्ग सुरू आहे. मात्र इगतपुरी ते कल्याण हा प्रवास सर्वाधिक जिकरीचा आहे. विविध ठिकाणी स्थानिक अडथळे, कोंडी यामुळे प्रवासासाठी मोठा वेळ जातो. त्यात कसारा घाटात इगतपुरीपर्यंतचा प्रवास वेळखाऊ आणि धोकादायक आहे. अजवड वाहनांमुळे येथे कोंडी वाढते आहे. त्यामुळे इगतपुरी ते आमणे हा टप्पा वेळेत सुरू व्हावा अशी मागणी होती. मात्र पुन्हा हा मुहुर्त हुकल्याने संताप व्यक्त होतो आहे.
चोरवाटाही बंद

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू असताना तसेच पूर्ण झाल्यानंतर या मार्गाचा आमणे ते कसारा असा प्रवास वाहनचालक करत होते. चोरमार्गाने कल्याण, येथील सावद, खडवली येथून कसारा बोगद्यापूर्वी वाहनचालक बाहेर पडत होते. तेथून पुन्हा घाटाचा प्रवास करत इगतपुरी येथून समृद्धी महामार्गावर जात होते. मात्र उदघाटनासाठी या चोरवाटाही बंद करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता हा मार्ग सोहळ्यासाठी न थांबवता खुला करावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.