ठाणे पूर्वेकडील वाहतूक नियोजनासाठी पुलाचे वर्तुळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे पूर्व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने आखलेल्या रेल्वे परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पाची मार्गिका (सॅटिस) कोपरी पूल, सिद्धार्थनगर, रेल्वेस्थानक, बारा बंगला अशा भागांतून वळवण्याचा निर्णय पक्का झाला आहे. त्यामुळे कोपरी परिसरात एकप्रकारे सॅटिसच्या मार्गाचे एक वर्तुळच उभे राहणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पांतर्गत ठाणे स्थानक ते घोडबंदर या मार्गावर धावणाऱ्या बसगाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात येणार आहे.

ठाणे स्थानकाच्या पश्चिमेकडे उभारण्यात आलेल्या ‘सॅटिस’पुलामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी फारशी कमी झाल्याचे चित्र नाही. या पुलावर टीएमटी बसगाडय़ा धावत असल्या तरी खालच्या भागात रिक्षा तसेच खासगी वाहनांची वर्दळ असल्याने ‘सॅटिस’चा प्रकल्प प्रभावी ठरलेला नाही. अशातच आता पूर्वेकडील परिसरात सॅटिसची उभारणी करताना प्रशासनाने नियोजनावर लक्ष दिले आहे.

सद्य:स्थितीत या प्रकल्पाचे आराखडे तयार करण्यात आले असून त्यामध्ये तीन किलोमीटर अंतराची मार्गिका असणार आहे. कोपरी सर्कल, सिद्धार्थनगर, ठाणे रेल्वे स्थानक (पूर्व), मंगला हायस्कूल, एसईझेड, कोपरी मलनि:सारण प्रकल्प, वनविभाग कार्यालय परिसर आणि मुंबई-नाशिक द्रुतगती महामार्ग, अशी ही मार्गिका असणार आहे. कोपरी स्थानकापासूनच काही अंतरावर खासगी बससाठी थांबा आणि त्यानंतर याच भागातून पुलाखाली जाण्यासाठी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटीमधून निधी खर्च केला जाणार आहे. रेल्वेची जागाही या प्रकल्पात बाधित होणार असून महापालिकेने रेल्वे प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. गेल्या आठवडय़ात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला आहे.

‘स्कायवॉक’ मात्र जमीनदोस्त

ठाणे पूर्व स्थानक परिसरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रवाशांसाठी स्कायवॉक उभारण्यात आला. या स्कायवॉकची मार्गिका अष्टविनायक चौकाच्या दिशेने करण्यात येणार होती. मात्र स्थानकांतील प्रवासी या दिशेने फारसे वाहतूक करीत नसून ही मार्गिका सिद्घार्थनगरच्या दिशेने करावी, अशी मागणी करत स्थानिकांनी प्रकल्पास विरोध केला होता.  विरोधाचे अडथळे पार करत स्कायवॉकची उभारणी करण्यात आली. मात्र, या स्कॉयवॉकवरून अतिशय कमी प्रवासी मार्गक्रमण करतात. असे असतानाच हा स्कायवॉक आता ठाणे पूर्व स्थानक सॅटिस प्रकल्पात बाधित होणार आहे. मंगला हायस्कूलजवळून सॅटिसची मार्गिका जाणार असल्यामुळे या भागातील स्कायवॉक तोडावा लागणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc make satis project for thane east to solve traffic issue problems
First published on: 02-11-2017 at 02:14 IST