लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली- येथील पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावर संत नामदेव पथ वळण मार्गावर काही फळ विक्रेते रस्त्याचा कोपरा अडवून व्यवसाय करतात. या भागातून येजा करणारी वाहने, पादचाऱ्यांना या विक्रेत्यांच्या मंचाचा (स्टॉल) त्रास होत आहे. सर्वाधिक वर्दळीच्या वळण रस्त्यावर हे फळ विक्रेत बसुनही पालिकेकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने प्रवासी, पादचारी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

काही राजकीय मंडळींचे पाठबळ असल्याने ते कोणालाही ऐकत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही पादचाऱ्यांनी या फळ विक्रेत्यांना वर्दळीचा रस्ता सोडून इतर भागात व्यवसाय करण्याची सूचना केली. त्यावेळी ‘तुम्ही आम्हाला सांगणारे कोण. आम्ही पालिका कर्मचाऱ्यांना हप्ता देतो. त्यामुळे आम्हाला कोणी काही करू शकत नाही,’ अशी उलट धमकी हे फेरीवाले जाब विचारणाऱ्या पादचाऱ्याला देतात, असे पादचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला अटक, पीडितेला त्रास देण्यात तरुणाच्या बहिणीची साथ

शिळफाटा रस्ता, सागाव, गांधीनगर, पी ॲन्ड टी कॉलनी भागातून येणारी बहुतांशी वाहने गोग्रासवाडी भागात जाताना मानपाडा रस्त्याने संत नामदेव पथावरुन इच्छीत स्थळी जातात. ही वाहने नामदेव पथावर वळण घेण्याच्या कोपऱ्यावर फळ विक्रेते सकाळपासून विजेच्या खांबाचा आडोसा घेऊन आपले मंच मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर लावतात. वाहतूक पोलिसांनाही या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला अडथळा येतो याची जाणीव आहे. त्यांना फेरीवाले हटविण्याचा अधिकार नाही. त्यांना या फेरीवाल्यांकडे बघण्या शिवाय पर्याय नाही.

अशाच पध्दतीने गोग्रासवाडी, शांतीनगर, पाथर्ली-एमआयडीसी रस्त्यावर दुतर्फा फेरीवाले हातगाडया, पदपथ अडवून व्यवसाय करतात. या फेरीवाल्यांमुळे सकाळपासून हा रस्ता वाहन कोंडीत अडकलेला असतो. या रस्त्याच्या दुतर्फा दुकाने आहेत. या दुकानदारांची वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. या भागातून शाळांच्या बस येजा करतात. विद्यार्थ्यांना या फेरीवाला, वाहन कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो,अशा तक्रारी शाळा चालकांनी केल्या.

आणखी वाचा-कल्याण येथील बंद एनआरसी कंपनीतील रोहित्रामध्ये स्फोट होऊन दोन जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फ प्रभागाच्या अंतर्गत हा भाग येतो. परंतु, शहराच्या अंतर्गत भागात फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. डोंबिवली पश्चिमेत ह प्रभागातील चौक, वर्दळीचे रस्ते फेरीवाले, हातगाडी चालकांनी गजबजून गेले आहेत. आता तर गोपाळकाला, गणेशोत्सवसाचे मंडप भर रस्त्यात टाकण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे येणारा महिनाभर डोंबिवलीत जागोजागी कोंडी होण्याची शक्यता आहे.