scorecardresearch

‘हो मी गद्दार आहे’ ; अंबरनाथमध्ये बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकरांविरुद्ध फलकबाजी

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरुद्ध आता अंबरनाथमध्ये फलकबाजी करण्यात आली आहे.

MLA Dr Balaji Kinikar
अंबरनाथमध्ये आमदार डॉ. बालाजी किणीकरांविरुद्ध फलकबाजी ( प्रतिनिधिक छायाचित्र )

अंबरनाथ:- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरुद्ध आता अंबरनाथमध्ये फलकबाजी करण्यात आली आहे. ‘ हो मी गद्दार आहे’ असा संदेश लिहिलेले आणि डॉ. बालाजी किणीकर यांचे छायाचित्र असलेले कागदी फलक अंबरनाथच्या काही भागात चिटकवण्यात आले आहेत. अंबरनाथ शहरातील काही शिवसेना आणि युवा सेना पदाधिकारी सुरुवातीपासूनच समाज माध्यमांवर डॉ. किणीकर यांचा विरोध करत आहेत. पहिल्यांदाच शहरात उघडपणे हा विरोध केला गेला आहे.

शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान उभे केले आहे. त्यांच्या या बंडखोरीत राज्याच्या विविध भागातील आमदार सहभागी आहेत. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही एकनाथ शिंदे यांना उघड पाठिंबा देत त्यांच्या गटात सामील झाले आहेत. सध्याच्या घडीला डॉ. किणीकर गुवाहाटी मध्ये बंडखोर आमदारांसोबत आहेत. डॉ. बालाजी किणीकर बंडखोर आमदारांसमवेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला अंबरनाथ शहरातून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र दोन दिवसानंतर समाज माध्यमांवर किणीकर यांचा निषेध केला गेला. पूर्व भागात काही ठिकाणी डॉ. किणीकर आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणारे फलक लावण्यात आले होते. त्यातील काही फलक परत काढण्यातही आले.

डॉ. बालाजी किणीकर हे एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शनिवारी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर शहरातील कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे प्रकरण ताजे असतानाच अंबरनाथ शहरात उड्डाणपूल आणि मध्यवर्ती भागात डॉ. किणीकर यांच्या विरोधात फलकबाजी करण्यात आली आहे. ‘हो मी गद्दार आहे’, असा संदेश लिहिलेले आणि डॉ. किणीकर यांचे छायाचित्र असलेले फलक काही ठिकाणी चिटकवण्यात आले आहेत. त्यामुळे उल्हासनगर पाठोपाठ आता अंबरनाथ शहरातही शिवसेनेत फूट दिसून आली असून डॉ. किणीकर यांचा उघड विरोध केला जातो आहे.

हे फलक लावण्याची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी हे फलक काढण्यास सुरुवात केली होती. हे बॅनर कुणी लावले याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traitor ambernath rebel mla dr balaji kinikar shivsena eknath shinde amy

ताज्या बातम्या