कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी मुंब्रा येथील दोन रहिवाशांकडून २१ किलो ग्रॅम वजनाचा पाच लाख १८ हजार रूपये किमतीचा गांजा जप्त केला. हे दोन्ही तस्कर भुवनेश्वर ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसने आले होते. कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर विशेष पोलीस पथकाने त्यांना अटक केली.
कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकमल खान मोहम्मद यामीन खान (३०, रा. शीळफाटा, मुंब्रा पूर्व), आबिद माजीद शेख (२३, रा. खर्डी गाव, मुंब्रा) अशी अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत. रेल्वे स्थानकातील गैरप्रकार रोखण्यासाठी, अंमली पदार्थ तस्करी रेल्वेने होऊ नये म्हणून विशेष पोलीस पथकाची कल्याण रेल्वे स्थानकात गस्त असते.
शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता विशेष पथक कल्याण रेल्वे स्थानकात गस्त घालत होते. यावेळेत भुवनेश्वर ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक सहावर आली. एक्सप्रेसमधून उतरणाऱ्या, चढणाऱ्या प्रवाशांच्या हालचालींवर गस्ती पथकाची नजर होती. यावेळेत दोन प्रवासी संशयास्पद हालचाली करत भुवनेश्वर एक्सप्रेसमधून उतरून रेल्वे स्थानकाबाहेर पडत असल्याचे पोलीस पथकाच्या नजरेस आले. या दोघांकडे अवजड पिशव्या होत्या.
पथकाने त्यांना रोखले. त्यांच्या पिशव्यांची झडती घेतली. पिशव्यांमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गांजाच्या पुड्या पथकाला आढळल्या. २१ किलोग्रॅम वजनाच्या या गांजाची बाजारातील किंमत पाच लाख १८ हजार आहे. पथकाने दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली आहे. हा गांजा दोन्ही तस्करांनी कुठुून आणला आणि ते कोणाला विक्री करणार होते, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रोहित सावंत, साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत टेलर यांच्या पथकाने ही कारवाई केली. मागील महिन्यात पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांकडून लाखो रूपयांचा गांजा जप्त केला होता.
उल्हासनगर मधील हिललाईन पोलिसांनी मलंगगड रस्त्यावरील नेवाळी नाका भागातून गांजाची तस्कारी करणाऱ्या मुंब्रा येथील महिलेला अटक केली आहे. तिने हा गांजा पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील इसमाकडून खरेदी केला होता. नेवाळी नाका परिसरात गांजाची तस्करी वाढत असल्याने पोलिसांनी याठिकाणच्या गांजा तस्कारांच्या हालचालींवर नजर ठेवली आहे.