ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध मुख्य मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असतानाच, गेल्या दोन दिवसांपासून गणेशोत्सवानिमित्ताने कोकणवासियांची खासगी वाहने कोकणाच्या दिशेने जाण्यास सुरुवात झाली असून अद्याप तरी कोंडी झालेली नाही. परंतु रविवारी या वाहना संख्येत आणखी वाढ होऊन ठाणे, नवी मुंबईत वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कोंडी टाळण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई पोलिस सज्ज झाले असून नवी मुंबई पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे.
कोकणात गणेशोत्सव आणि शिमगोत्सव हे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या उत्सवासाठी मुंबई महानगरात राहणारे कोकणवासिय गावी जातात. या उत्सवासाठी काहीजण खासगी वाहनांचा वापर करतात. तर, काहीजण एसटी बसगाड्या किंवा खासगी बसगाड्यांनी जातात. रेल्वेनेही जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेते कोकणवासियांसाठी एसटीच्या बसगाड्यांमधून मोफत सोडत आहेत. उत्सवाच्या काळात कोकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने रस्ते वाहतूकीवर भार वाढून कोंडी होते. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मोठ्यासंख्येने कोकणवासी नागरिक नोकरी आणि व्यवसायनिमित्त राहतात.
या नागरिकांची वाहने ठाणे आणि नवी मुंबई मार्गे कोकणच्या दिशेने जातात. यामुळे या मार्गावर दरवर्षी कोंडी होते. गेल्या दोन दिवसांपासून गणेशोत्सवानिमित्ताने कोकणवासियांची खासगी वाहने कोकणाच्या दिशेने जाण्यास सुरुवात झाली असून अद्याप तरी कोंडी झालेली नाही. परंतु रविवारी या वाहना संख्येत आणखी वाढ होऊन ठाणे, नवी मुंबईत वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ही कोंडी टाळण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई पोलिस सज्ज झाले आहे. ठाणे शहरात यापुर्वी विविध ठिकाणी क्रेन तैनात केल्या असून त्याद्वारे एखादे वाहन बंद पडल्यास ते तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले. तर, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना नवी मुंबईतील महामार्गांवरून निर्विघ्नपणे जाता यावे यासाठी नवी मुंबई पोलीस दलामार्फत व्यवस्थित बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून पर्यायी मार्ग सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी सांगितले.
नवी मुंबई पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. यानुसार, शनिवारपासून ते २६ ऑगस्टपर्यंत शीव–पनवेल महामार्गासह नवी मुंबईतील इतर महामार्गांवर हे नियोजन राबवले जाणार आहे. टोलमाफीपासून मदत केंद्रांपर्यंत सर्व सोयी यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक चौकीत पाच मिनिटांत पास वितरण, वाहनचालकांसाठी सुविधा व मार्गदर्शन, महामार्गावर नादुरुस्त वाहनांसाठी ११ क्रेन व १४ मॅकेनिक, अपघातग्रस्तांसाठी औषधे, रुग्णवाहिका व आपत्कालीन साहित्य, अशा सुविधांचा समावेश आहे.
राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोलमुक्तीची घोषणा केली. त्यानुसार शनिवारी अनेक गणेश भक्त हे टोलपास घेऊन गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघाले. अनेकांनी टोलपास दाखवले पण, त्यानंतही फाशटॅगमधून अनेकांचे पैसे कापले गेल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. असाच फटका ठाण्यातील रहिवाशी शुभांगी कदम यांना बसला असून त्यांनी टोलमुक्त पास हा नावालाच होता का असा प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला.