कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेने २७ गावांसाठी काहीही केले नाही. फक्त महसूल मिळविला आणि विकासाच्या बाबतीत आम्हाला नेहमीच दूर ठेवले. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेत आम्हाला राहायचेच नाही. आम्हाला पालिकेतून बाहेर पडायचे आहे. पालिकेने २७ गावांची आगामी पालिका निवडणुकांचा विचार करून केलेली प्रभाग रचना मान्य नाही, असे २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीचे सत्यवान म्हात्रे यांनी गुरूवारी माध्यमांना सांगितले.
कल्याण डोंबिवली पालिकेने आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करून २७ गाव हद्दीत जे प्रभाग तयार केले आहेत. त्या प्रभाग रचनेला आमचा ठाम विरोध आहे. या प्रभाग रचनेला आव्हान देण्यासाठी आम्ही सुमारे तीन ते चार हजार हरकती दाखल केल्या आहेत, अशी माहिती सत्यवान म्हात्रे यांनी माध्यमांना दिली. प्रभाग रचनेसंदर्भात हरकती दाखल करण्यासाठी संघर्ष समितीचे कार्यकर्ते गुरुवारी पालिकेत आले होते.
आम्ही पहिल्यापासून कल्याण डोंबिवली पालिकेत समाविष्ट होण्यास तयार नाहीत. आम्हाला विश्वासात न घेता कल्याण डोंंबिवली पालिकेने आगामी पालिका निवडणुकीचा विचार करून २७ गाव हद्दीत प्रभाग रचना जाहीर केली आहे. ही रचना कोणालाही मान्य नाही. या प्रभाग रचनेला आव्हान देण्यासाठी आम्ही सुमारे चार हजार हरकती पालिकेत दाखल केल्या आहेत, असे सत्यवान म्हात्रे यांनी सांगितले.
सर्व पक्षीय ग्रामीण संघर्ष समितीच्या या इशाऱ्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्यावेळी २७ गावांचा पालिकेवर बहिष्कार राहण्याची शक्यता आहे. मागील तीस ते पस्तीस वर्षापासून डोंबिवली, कल्याण जवळील २७ गावे आम्हाला स्वतंत्र महापालिका द्या, आम्ही आमचा कारभार करू अशी मागणी करून आहेत.
आम्हाला पालिकेत राहायचे नाही अशी ठाम भूमिका संघर्ष समितीची आहे. तरीही मागील पंधरा वर्षाच्या काळात २७ गावातील राजकीय दबदब्याचा अंदाज घेऊन भाजप, शिंदे शिवसेनेने या भागात आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून आपले नगरसेवक यापूर्वी २७ गाव प्रभागांमधून निवडून आणले. आता संघर्ष समितीने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत प्रभाग रचनेला विरोध केल्याने आगामी पालिका निवडणुका २७ गावांमध्ये होण्यावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
संघर्ष समितीच्या मागणीचा विचार करून ग्रामस्थांना शांत करण्यासाठी काही वर्षापूर्वी १८ गावे पालिकेतून वगळण्यात आली. महसुली उत्पन्न देणारी डोंबिवली, कल्याण शहरालगतची नऊ गावे राजकीय व्यूहरचनेतून पालिका हद्दीत ठेवण्यात आली. २७ गावातील ही विभागणी ग्रामस्थांंसह संघर्ष समितीला आवडलेली नाही. यापूर्वी २७ गावांची नगरपालिका तयार करण्याच्या जोरदार हालचाली शासनस्तरावर सुरू होत्या. त्यावरही नंतर विरजण पडले. आता नवी मुंबईची १४ गावे, २७ गावे आणि अंबरनाथलगतची गावे यांची एकत्रित महापालिका तयार करण्याचा विचार काही राजकीय मंडळींकडून बोलविला जात आहे.
२७ गावातील राजकीय वातावरण विचारात घेऊन या भागात शिंदे शिवसेना, भाजप आपले डावपेच खेळत असल्याचे चित्र आहे.