ठाणे : आनंद दिघे जिल्हाप्रमुख असताना अनंत तरे यांच्यासारख्यांना उपनेते करून दिघे साहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आनंद दिघे यांचा छळ करण्यात आला. त्यांना मानसिक त्रास देण्यात आला. अनंत तरे यांना दिघे साहेबांनी महापौर केले होते. असे असताना तरे यांना उपनेता करून आनंद दिघे यांचे खच्चीकरण करण्याचा डाव संजय राऊत यांनीच रचला होता, असा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज पत्रकार परिषद केला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्याबाबत केलेल्या विधाननंतर शिंदे गट आक्रमक झाला असून त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सुरु केले आहे. शुक्रवारी ठाणे लोकसभेचे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. आनंद दिघे हे जिल्हाप्रमुख असताना अनंत तरे यांना दिघे यांना विरोध करण्यासाठी उपनेते म्हणून नेमले होते.

आनंद दिघे यांचा छळ केला, त्यांना मानसिक त्रास दिला असा आरोप म्हस्के यांनी केला. आनंद आश्रमाची जागा ही संस्थेच्या नावाने आहे असाही दावा त्यांनी केला.

उरले-सुरलेले राजन विचारे यांचे कडेलोट करण्याचे काम

उरले-सुरलेल्या राजन विचारे यांचा बहुतेक कडेलोट करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. कारण त्यांच्यामध्ये अंतर्गत वाद आहेत. राजन विचारे हे विनायक राऊत यांचे फाॅलोवर आहेत. बाळासाहेबांचे प्रेम आणि आशिर्वाद हे एकनाथ शिंदे यांच्यावर होते म्हणून ते आमदार, मंत्री झाले. परंतु राजन विचारे यांच्या डोक्यावर एकनाथ शिंदे यांचा हात होता. त्यांनी शेंदूर लावला म्हणून राजन विचारे आमदार, खासदार झाले. शेंदूर लावण्याचे बंद केले, हात काढला तेव्हा राजन विचारे हे ना खासदार झाले, ना आमदार झाले आता नगरसेवक होतात का पाहू असा टोला म्हस्के यांनी राजन विचारे यांना लगावला.

एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाची कृपा नाही

राजन विचारे यांच्या त्यागामुळे एकनाथ शिंदे मोठे झाले असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली. सभागृह नेते हे दरवर्षी महापालिकेत बदलतात. ही आमची शिवसेनेची प्रथा आहे. त्यामुळे कोणाची कृपा ही शिंदे यांच्यावर नसल्याचा दावाही म्हस्के यांनी केला.

मला थांबविणारा अजून जन्माला यायचा आहे

म्हस्के हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. परंतु त्यांना मी थांबविले होते असा दावा राजन विचारे यांनी केल्यानंतर म्हस्के यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. मला थांबविणारा अजून जन्माला यायचा आहे. माझे आई-वडिल शिवसैनिक होते असे ते म्हणाले.

संजय राऊत यांना संपादक का नाही केले?

संजय राऊत हे अजूनही सामनामध्ये कार्यकारी संपादक आहे. ते संपादक का नाही होऊ शकले. रश्मी ठाकरे या संपादक झाल्या पण संजय राऊत झाले नाही. त्यांची लायकी उद्धव ठाकरे यांनीच दाखविली आहे असेही म्हस्के म्हणाले.