ठाणे: ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे ते माजिवडा येथील मार्गिकेच्या रुंदीकरणाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले. या महामार्गावरील साकेत, खारेगाव या महत्त्वाच्या पूलांचे काम अद्याप शिल्लक आहे. ही कामे आता पावसाळ्यानंतरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास भिवंडी, कल्याण, नाशिक भागातून ठाणे, मुंबईत जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.उरण येथील जेएनपीटी बंदरातून सुटलेली आणि नाशिक येथून घोडबंदर मार्गे वसई, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या हजारो अवजड वाहनांसाठी मुंबई नाशिक महामार्ग महत्त्वाचा आहे.

तसेच, कल्याण येथून ठाणे, मुंबईत येणारे वाहन चालक देखील याच मार्गाचा वापर करुन महामार्गाने येत असतात. त्यामुळे वाहनांचा भार या मार्गावर अधिक असतो. असे असले तरी महामार्गाचे हे रस्ते अरुंद असल्याने त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होत होता.

मुंबई नाशिक महामार्गावरील नाशिक ते ठाण्यातील माजिवडा हा मार्ग राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अख्यत्यारित आहे. या महामार्गाची लांबी १४२ किमी इतकी आहे. त्यापैकी भिवंडीतील वडपे ते माजिवडा या २३.८०० किमी प्रकल्पाच्या रस्ते रुंदीकरणाचे काम २०२१ पासून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरु आहे.

हा प्रकल्प ७५ टक्केच पूर्ण झाला आहे. असे असले तरी महत्त्वाचा टप्पा असलेल्या साकेत खाडी पूल, खारेगाव खाडी पूल या महत्त्वाच्या मार्गिकांचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. जुन्या खाडी पूलालगत हा पूल उभारला जात असल्याने खाडीवर पूल निर्माण करण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे. जून महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे खाडी पूलांची कामे आता पावसाळ्यानंतरच पूर्ण होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

प्रकल्पाचे वैशिष्ट्य- हा प्रकल्प २३.८०० किमी इतका आहे. सेवा रस्ते दोन पदरी आहेत. तर मुख्य मार्ग चार पदरी आहेत. येवई, वालशिंद, सोनाळे, सरवली, पिंपळा, ओवळी, दिवे आणि खारेगाव येथे भुयारी मार्ग उभारले जाणार आहेत. या मार्गावर साकेत, खारेगाव, रेल्वे पूल आणि वडपे पूल हे चार मोठे उड्डाणपूल आहेत. समृद्धी महामार्गाचे निर्माण काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे भविष्यात समृद्धी महामार्गाचा भार या महामार्गावर येणार आहे. समृद्धी आणि मुंबई नाशिक महामार्ग अशा दोन्हीचा भार या माजिवडा-वडपे मार्गावर भविष्यात असेल.