scorecardresearch

जंगली जयगड

कोयना नदी म्हणजे सुजलाम, सुफलाम महाराष्ट्राच्या संपन्नतेत भर घालणारी एक भाग्यदायी नदी.

जंगली जयगडला जाण्यासाठी कराडमार्गे कोयनानगरला पोहोचावे.
कोयना नदी म्हणजे सुजलाम, सुफलाम महाराष्ट्राच्या संपन्नतेत भर घालणारी एक भाग्यदायी नदी. महाबळेश्वरास उगम पावून कराडजवळ कृष्णेत समर्पित होणाऱ्या कोयना नदीने एक देखणे खोरे निर्माण केले आहे. या नदीवर जेव्हा हेळवाक जवळ कोयना धरण उभारले गेले तेव्हापासून कोयनानगर पर्यटनाच्या नकाशावर आले. या कोयनानगरजवळील रामघळ व भैरवगड तसे डोंगरयात्रींना परिचयाचे, पण समुद्रसपाटीपासून १०२९ मीटर उंचीवर उभा असणारा जंगली जयगड मात्र डोंगर भटक्यांना फारसा माहिती नाही.
जंगली जयगडला जाण्यासाठी कराडमार्गे कोयनानगरला पोहोचावे. येथील एस.टी. स्थानकावरून जंगली जयगड शेजारच्या नवजा गावासाठी पहिली बस सकाळी ८ ला सुटते. त्या बसने आपण अध्र्या तासाचा प्रवास करून नवजा गावात पायउतार होतो. सध्या किल्ल्यावर पाणी नसल्यामुळे गावातूनच आपल्याकडील बाटल्या भरून घ्यायच्या व टॉवर कॉलनीमार्गे पंचधारा बोगद्याकडे चालू लागायचे. अध्र्या तासाची पायपीट केल्यानंतर आपण पंचतारा बोगदा अलीकडील डाव्या हाताने वर डोंगरात चढणाऱ्या पायवाटेजवळ येऊन पोहोचतो. ही पायवाट थोडय़ा वेळेतच सपाटीवर घेऊन येते. येथून सरळ डोंगर चढाईच्या वाटेने चढल्यानंतर आपण घोडेतळ या निसर्गरम्य ठिकाणी येऊन पोहोचतो. या ठिकाणी पाण्याचा एक जिवंत झरा असून, विश्रांतीसाठी वन विभागाने एक दगडी कट्टासुद्धा बांधलेला आहे. गड पाहून परत आल्यावर पोटपूजा उरकण्यासाठी हे ठिकाण उत्तम! इंग्रजांच्या काळात जंगली जयगडला येणारे अधिकारी या ठिकाणी आपली घोडी उभी करून पुढे पायी गडाकडे जात असत. त्यामुळे या ठिकाणास घोडेतळ म्हटले जाते. नवजा गाव सोडल्यानंतर इथपर्यंत येण्यास साधारण दीड ते दोन तास लागतात. येथून आपण सरळ दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने चालू लागायचे. अध्र्या तासात मूळ पायवाटेला डावीकडे एक फाटा फुटतो. जंगली जयगडकडे जाणारी ही वाट सरळ डिचोली गावाकडे जाते. या डाव्या हाताच्या पायवाटेने निघालो की भोवतीचे जंगल घट्ट होते. ज्या जंगलामुळे या किल्ल्याचे नाव जंगली जयगड पडले. सदाहरित प्रकारातील या जंगलात बांबूचे प्रमाण अधिक आहे. या शिवाय ऐन, अंजन, वेत, कुंभा, जांभूळ, आंबा अशी नाना प्रकारची वृक्षराजी येथे आहे. त्यामुळे पशू-पक्ष्यांचे अस्तित्व मोठे आहे. जंगलातून वर चढणाऱ्या पायवाटेने लता-वेलींचे अडथळे पार करत आपण दरी काठाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. दरीच्या या माथ्यावर छोटेखानी झेंडय़ाचा गोलाकार बुरूज असून, त्यावर चढण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. आपण जंगली जयगडसमीप आलो याची ही खूण. घोडेतळापासून इथपर्यंत येण्यास अर्धा तास लागतो. या दरीच्या माथ्यावरून खाली उतरणाऱ्या पायवाटेने पुढे गेल्यावर समोरच खोल दऱ्यांच्या मधोमध वसलेला जंगली जयगड दिसतो. हा गड सह्य़ाद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या डोंगरावर उभा असून, त्याची एक चिंचोळी धार सह्य़ाद्रीशी जोडली गेली आहे. दाट झाडीतून खाली उतरणाऱ्या पायवाटेने उघडय़ा-बोडक्या गडाकडे नेणाऱ्या चिंचोळ्या धारेवर काळजीपूर्वक उतरायचे. पुढे एक-दोन टेकडय़ांना बाजूला ठेवत गडाच्या मुख्य डोंगरासमोर आपण येऊन पोहोचतो.इथे जांभ्या दगडातील तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. गडाचे प्रवेशद्वार भूकंपात ढासळलेले आहे. पुढे काही इमारतींच्या जोत्यांमधून आपण आत प्रवेश करतो. जयगडाच्या मुख्य सपाटीवर पोहोचताच किल्ल्याचा चिंचोळा आकार पटकन आपल्या नजरेत भरतो. तसेच किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी सरळ दरी असल्यामुळे जंगली जयगडाच्या निर्मात्यास याच्या रक्षणासाठी तटबंदी बांधण्याची फारशी गरज उरलेली नाही. इथेच एक दगडी चौथरा दिसतो. तो पाहून पुढे जाताच भग्न मंदिर दिसते. हे छोटेखानी मंदिर, त्याच्यासमोर भूकंपाचा धक्का पचवून ताठ मानेने उभी असलेली दगडी दीपमाळ व तेथे असणारे एक दगडी भांडे आदी दुर्गअवशेष गडाचे वातावरण जिवंत करतात. हे ठिकाण म्हणजे गडदेवता ठाणाईचे मूळ ठिकाण असून, सध्या मात्र येथील छोटी घुमटी मूर्तीविरहित आहे.
यापुढे पुन्हा एका उंच टप्प्यावर चढायचे. इथे चौकोनी दगडी बांधकाम असलेला एक बुरुज असून, त्याचा उपयोग इतिहासात टेहळणीसाठी होत असे. त्या चौथऱ्यासमोरच आपणास राजवाडय़ाचा चौथरा पाहायला मिळतो. राजवाडय़ाच्या मागे डाव्या हातास दरीच्या माथ्यावर मातीने भरलेली जांभ्या दगडातील एक बांधिव विहीर पूर्णपणे मातीने भरून गेलेली आहे. ही विहीर पाहून आपण गडाच्या पिछाडीच्या पश्चिम टोकावर यायचे. येथून खाली दरीत पोफळी लाईट हाऊस, समोर एअर व्हील, तर उजव्या हातास कोळकेवाडी जलाशय आणि या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी केलेला नागमोडी पोफळी घाटही व्यवस्थित न्याहाळता येतो. सभोवार तळकोकणचे रम्य दृश्य दिसते. उत्तरेस नजर फेकताच वासोटा ऊर्फ व्याघ्रगड, महिमंडणगड व मकरंदगड तर त्याच्या डावीकडे रसाळ, सुमार व महिपत ही इतिहासप्रसिद्ध दुर्गत्रयी आपणास साद घालतात. दक्षिणेला पोफळी घाटापलीकडे भैरवगड, तर तळात पार वशिष्ठीच्या काठावर निवांत पहुडलेले चिपळूण शहर आपले लक्ष वेधून घेते.
कुंभार्ली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी इतिहास काळात जंगली जयगडची निर्मिती करण्यात आली. शिवकाळात हा गड शिवाजी महाराजांच्या अमलाखाली होता.
इतिहासात याच्या शेजारील हेळवाक हे गाव बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे जंगली जयगडचा समावेश हेळवाक महालात होत असे. पुढे १७५८-५९ मध्ये पंतप्रतिनिधींकडील हा किल्ला पेशव्यांचे सरदार खंडोजी मानकर यांनी घेतला, पण पेशव्यांनी याचा ताबा परत पंतप्रतिनिधींकडे देण्यास सांगितले. पुढे १८१० मध्ये प्रतिनिधींची आश्रित ताई तेलीण हिच्या ताब्यातून पेशव्यांचा सेनापती बापू गोखले यांनी हा किल्ला जिंकून घेतला.
शेवटी १८१८ च्या इंग्रज-मराठे युद्धात कर्नल हिवेट याच्या नेतृत्वाखालील फौजेने हा किल्ला जिंकून घेतला.
असा हा किल्ला त्याच्या पर्यंत पोहोचेपर्यंत पार कराव्या लागणाऱ्या जंगलच्या तटबंदीमुळे जंगली जयगड हे नाव सार्थ करतो.

– भगवान चिले

मराठीतील सर्व Trek इट ( Trekit ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article on jaigad fort

ताज्या बातम्या