कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट दिल्यानंतर तेथील एक विशिष्ट आठवण कायम आपल्या लक्षात राहते. या आठवणी स्मरणात रहाव्यात यासाठी काहीवेळा आपण कुटुंबासमवेत फोटो वैगरे काढून या आठवणी कैद करत असतो. यात कडू-गोड अशा दोन्ही आठवणी आपल्या लक्षात राहतात. मात्र या प्रवासातल्या अशाही काही आठवणी असतात ज्या कोठेही कैद करण्याची गरज नसते त्यांचे नाव जरी काढले तरी संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. असाच एक प्रकार एका परदेशी कुटुंबीयाबरोबर घडला आहे.

मुमताज आणि शहाजहान यांच्या प्रेमाचं प्रतिक अर्थात ताजमहाल पाहण्यासाठी अनेक पर्यटक आग्र्याला भेट देत असतात. हा ताजमहाल पाहण्यासाठी परदेशी पर्यटकांची संख्या अधिक असते. मात्र सध्या या परिसरात पर्यटकांपेक्षा माकडांचा सुळसुळाट अधिक झाला आहे. माकडांच्या याच उपद्रवामुळे येथे येणा-या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी अशाच काही पर्यटकांवर माकडांनी हल्ला केल्याची माहिती ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

ताजमहाल पहायला आलेल्या एका परदेशी कुटुंबावर काही माकडांनी हल्ला केला. या माकडांपासून वाचण्यासाठी या कुटुंबियांनी खूप प्रयत्न केला मात्र त्याची ही कृती पाहून माकडांनी आणखीनच जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात एक परदेशी महिला जखमी झाली आहे. माकडांच्या हल्ल्याची तीव्रता इतकी जास्त होती की त्यात महिलेच्या पायाला जबर दुखापत झाली. या दुखापतीमुळे या महिलेला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला. या घटनेनंतर उपस्थित माकडांना जरी पिटाळून लावण्यात आले असले मात्र तरी येथे माकडांच्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.