‘विप्रो’चे संचालक आणि ज्येष्ठ उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी गरीब, वंचितासाठी देण्यात येणाऱ्या देणगीमध्ये तब्बल ५२,७५० कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळं त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या एकूण देणगीची रक्कम १ लाख ४५ हजार कोटी रुपये इतकी झाली आहे. समाजसेवासाठी देण्यात येणाऱ्या देणगीमध्ये त्यांनी आता बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे. आपली ५० टक्के संपत्ती दान करू अशी घोषणा काही वर्षांपूर्वी अझीम प्रेमजी यांनी केली होती. त्यानुसार व्हिप्रोच्या नफ्यातील मोठा वाटा ते अझीम प्रेमजी फाउंडेशनला दान करतात.

विप्रो लिमिटेडमधील त्यांच्या भागभांडवली मालकीतून येणाऱ्या लाभातील ३४ टक्के आर्थिक लाभ हे समाजसेवासाठी राखून ठेवण्याचा बुधवारी निर्णय जाहीर केला. विप्रोमध्ये प्रेमजी यांची वैयक्तिक समभाग मालकीचे मूल्य सुमारे ५२,७५० कोटी रुपयांचे आहे. प्रेमजी यांच्या या नव्या निर्णयाने ‘अझीम प्रेमजी फाऊंडेशन’ या त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी असलेल्या संस्थेचा एकूण देणगी कोष १.४५ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. फाऊंडेशनचे विप्रो लिमिटेडमध्ये ६७ टक्क्यांचे आर्थिक स्वामित्वही आहे. अझीम प्रेमजी फाऊंडेशन मुख्यत: शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करते आणि या क्षेत्रात कार्य करीत असलेल्या अन्य ना-नफा तत्त्वावरील संघटनेसाठी बहुवार्षिक वित्तीय अनुदान देते.

प्रेमजी विद्यापीठही शिक्षणाचे कार्य करते. या कार्याला अधिक गती यावी म्हणून प्रेमजींनी देणगीची रक्कम वाढवली आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठात सध्या १३०० विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या १४ हजारपर्यंत नेण्याची फाउंडेशनची इच्छा आहे. तसंच, या विद्यापीठाची उत्तर भारतातही एक शाखा सुरू केली जाणार आहे.