२२ वर्षांचे असताना अल्ताफ अहमद मीर अनंतनाग जंगलातील मंडीमध्ये असणारे आपले घर सोडून १९९० मध्ये पाकिस्तानात गेले होते. त्यांना आतंकवादी बनायचे होते. त्यांनी घर सोडून तीन दशके होत आली असून त्यांचे एक गाणे सध्या काश्मीर आणि इतरही भागातील लोकांचे मन जिंकत आहे. शायर गुलाम अहमद महजूर यांच्या हा गुलो या गाण्याचे नवीन रुपातील हे गाणे पहिले काश्मिरी गाणे आहे जे कोक स्टुडियो एक्स्प्लोररचा हिस्सा आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कास्मीरमध्ये हे गाणे बनविण्यात आले असून नुकतेच ते यु ट्यूबवर अपलोड करण्यात आले. हे गाणे अवघ्या ४ दिवसांत तीन लाखहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.

”हा गुलो तुही मा सा वुचवुन यार मुएं, बुलबुलू तुही चांदतूं दिलदार मुएं” असे या गाण्याचे बोल आहेत. मीर यांचे भाऊ जावेद अहमद म्हणाले, तो लहानपणापासून कलाकारी करायचा आणि संगीताकडे त्याचा विशेष कल होता. पाकिस्तानात निघून गेल्यावर मीर ४ वर्षांनी काश्मीरमध्ये परत आला होता आणि आतंकवादाच्या वाटेवर नव्हता. घाटीमध्ये आतंकवादाचे दृश्य बदलले असून इखवानचा म्हणजे आतंकवादाचा बिमोड करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फोर्सचा प्रभाव वाढला आहे. इखवानच्या भितीने मीर यांनी पुन्हा बॉर्डर पार केली. त्यानंतर मुजफ्फराबादमध्ये ते स्थायिक झाले.

मुजफ्फराबादमध्ये मीर यांनी नक्काशीमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या एका एनजीओसाठी काम सुरु केले. त्याचवेळी त्यांनी कसामीर नावाचा एक बँड सुरु केला. मागच्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना पहिला ब्रेक मिळाला. त्यावेळी कोक स्टुडीयोची एक टीम पाकिस्तानमध्ये नवीन प्रतिभा शोधण्यासाठी निघाली होती. त्यावेळी या टीमने मीर आणि त्यांच्या टीमची निवड केली. मूळचे काश्मीरचे असणाऱ्या या सर्व कलाकारांनी सादरीकरण केले. यामध्ये गुलाम मोहम्मद डार (सारंगी), सैफ-उद-दीन शाह (तुम्बाखनईर – ड्रमसारखे दिसणारे एक काश्मीरी वाद्य), मंजूर अहमद खान (नाउत – काश्मीरी वाद्य) आणि स्वत: मीर यांचा समावेश होता.