संपूर्ण जगाला सध्या करोना विषाणूचा फटका बसलेला आहे. भारतामध्येही प्रत्येक दिवशी विविध शहरात करोनाचे रुग्ण सापडत आहेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. दरम्यान लॉकडाउनच्या काळात भारतीय खेळाडू सध्या घरात बसून जास्तीत जास्त वेळ आपल्या परिवारासोबत घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या संपूर्णपणे संसारी माणूस झालेला आहे.

एरवी सतत मैदानात असणारे भारतीय खेळाडू सध्या घरात अडकले आहेत. त्यामुळे दिवसाची सुरुवात व्यायामाने करुन मग मुलीसोबत खेळणं बायकोला स्वयंपाकात मदत आणि रात्री एकत्र बसून टिव्हीवर वेगवेगळे शो बघणं हा रोहित शर्माचा दिनक्रम बनला आहे. मुंबई इंडियन्सने रोहितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

२९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार होती. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार होता. परंतु करोनामुळे देशातल्या परिस्थितीत सुधारणा न झाल्यामुळे बीसीसीआयने अखेरीस स्पर्धा स्थगित केली आहे.