Viral Video : चित्रकार वेगवेगळे रंग वापरून, त्याच्या चित्रांना बोलकं करतो. चित्रकाराच्या जाहिरात, मुखपृष्ठ, व्यंगचित्र, निसर्गचित्र आदी अनेक चित्रांचे प्रकार तुम्ही आजवर पाहिले असतील. पण, आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, पुस्तकांपासून एक खास पोट्रेट तयार करण्यात आलं आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एका व्हिडीओत चक्क असंख्य पुस्तकांनी एक खास पोट्रेट तयार करण्यात आल्याचं दिसेल; जे पाहून तुम्ही काही क्षणांसाठी चकित व्हाल…

हा व्हिडीओ पुस्तकांच्या एका दुकानाचा आहे. जिथे असंख्य पुस्तकं तुम्हाला दिसतील. या पुस्तकांच्या अगदी मधोमध एक तरुणी हातात मांजर घेऊन बसली आहे, असं एक चित्र मोठ्या बोर्डवर लावण्यात आलं आहे. जेव्हा व्हिडीओ हळूहळू ‘झूम’ होतो तेव्हा समजतं की, हे चित्र नसून, पुस्तकांनी तयार केलेलं एक खास पोट्रेट आहे. अनेक पुस्तकांची रचना एखाद्या चित्राप्रमाणे करण्यात आली आहे. पुस्तकांतून तयार केलेलं हे खास पोट्रेट एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

हेही वाचा…चंद्रपूर : आठ तास अभ्यास, आठ तास झोप, मित्रांसोबत गप्पा आणि..; पोलीस अधीक्षक परदेशी आणि विद्यार्थ्यांमध्ये रंगल्या आयएएस होण्याच्या गप्पा

व्हिडीओ नक्की बघा :

चित्रं नव्हे हे तर पुस्तक :
पुस्तकांच्या दुकानात एका ब्लॅक बोर्डवर एकावर एक पुस्तकं रचून ठेवलेली आहेत. हे पाहून तुम्हाला वाटेल की, एका चित्रकारानं जणू चित्र रेखाटून ठेवलं आहे; पण मांजर हातात घेऊन बसलेल्या तरुणीचं हे खास पोट्रेट पुस्तकांपासून तयार करण्यात आलं आहे. ते बघता क्षणी कोणाचा विश्वास बसणार नाही. खास गोष्ट अशी की, या पोट्रेटमधील तरुणीच्या सौंदर्याच्या गोष्टी लक्षात ठेवून, त्या त्या रंगाच्या पुस्तकांची योग्य त्या ठिकाणी रचना करण्यात आली आहे.

पुस्तकांच्या पोट्रेटचा हा खास व्हिडीओ @thejourneyofrose यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक जण हे खास पोट्रेट तयार करणाऱ्यांच्या मेहनतीला दाद देत आहेत; तर काही जण पोट्रेटमधील आवडणाऱ्या गोष्टी कमेंटमध्ये नमूद करताना दिसून आले आहेत.