यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये अनेक गोष्टी चर्चेत येत असल्याचं दिसत आहे. अफगाणिस्तानचा संघ आणि या संघाचा कर्णधार मोहम्मद नबी यांची देखील या विश्वचषकात विशेष चर्चा रंगली आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर पहिल्यांदाच अफगाणिस्तानचा संघ क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत असताना सोमवारी त्यांनी स्कॉटलंडवर तब्बल १३० धावांनी विजय मिळवला. या प्रचंड मोठ्या विजयामुळे अफगाणिस्तानचा संघ चर्चेत आला असताना आता संघाचा कर्णधार मोहम्मद नबी याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडीओ सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेतला असून यात नबीनं दिलेल्या मिश्किल प्रतिक्रियेमुळे उपस्थित पत्रकारांमध्ये हसू पसरलं.
नेमकं झालं काय?
सोमवारी स्कॉटलंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर प्रथेप्रमाणे दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या पत्रकार परिषदा झाल्या. यावेळी अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी पत्रकार परिषदेसाठी आला, तेव्हा हा किस्सा घडला. पत्रकार परिषदेसाठी सर्व इंग्रजी माध्यमाचे प्रतिनिधी पाहिल्यानंतर विचारले जाणारे प्रश्न इंग्रजीतून येणार असल्याचा अंदाज नबीला आला होता. त्यावरच त्यानं पहिली प्रतिक्रिया दिली!
पत्रकार परिषदेसाठी खुर्चीवर बसताच तो म्हणाला, “सगळ्यात कठीण काम आहे बाबा हे”! यापाठोपाठ त्यानं बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला विचारलं, “किती प्रश्न विचारले जाणार आहेत?” त्यावर बाजूच्या व्यक्तीनं दिलेल्या उत्तरावर बोलताना मोहम्मद नबी म्हणाला, “माझं इंग्रजी तर ५ मिनीटांत संपून जाईल!”
मोहम्मद नबीचा राष्ट्रगीत गातानाचा व्हिडीओ व्हायरल
हा सामना सुरू होण्यापूर्वी अफगाणिस्तानचं राष्ट्रगीत गाताना मोहम्मद नबीला अश्रू अनावर झाल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचं प्रतिनिधित्व करताना जागतिक स्पर्धेमध्ये अफगाणिस्तानचं राष्ट्रगीत गाताना त्याला अश्रू अनावर झाले होते.
अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी याचा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर करत अफगाणिस्तानच्या खेळाडूंची ही कृती म्हणजे तालिबान्यांच्या पाक पुरस्कृत अत्याचारांना दिलेलं उत्तर असल्याचं देखील त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.