टेलिग्रामच्या माध्यमातून धर्मांतरासाठी सेक्सटॉर्शन रॅकेट चालवणाऱ्या मुंबईतील एका मॉडेलला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मॉडेलने तिच्या काही साथीदारांसह टेलिग्रामवर काही लोकांना ‘हनी ट्रॅप’मध्ये फसवले. त्यानंतर त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची आणि खतना करण्याची धमकी देत मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. ही घटना बेंगळुरूमधील पुट्टेनहल्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

२० ते ५० वयोगटातील पीडितांना केले टार्गेट

नेहा ऊर्फ ​​मेहर, असे अटक केलेल्या मॉडेलचे नाव असून, प्राथमिक तपासात ती या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नेहा ऊर्फ ​​मेहर टेलिग्रामवरून बेंगळुरूमधील २० ते ५० वयोगटातील अनेकांशी रोमँटिक संवाद साधायची. अशा प्रकारे ती तरुणांना ‘हनी ट्रॅप’मध्ये फसवून, त्यांना जेपी नगरमधल्या एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील राहत्या घरी शारीरिक संबंध ठेवण्याचे आमिष दाखवून बोलवायची. त्यानंतर ट्रॅपमध्ये फसलेली व्यक्ती तिच्या घरी येताच, बिकिनी घालून त्या व्यक्तीला आत बोलवायची. त्यानंतर ही मॉडेल फसल्या गेलेल्या त्या व्यक्तीला जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करायला भाग पाडायची.

पीडिताचे खासगी प्रसंगाचे फोटो व्हिडीओ करायचे शूट

त्यानंतर त्या मॉडेलची टोळी घरात घुसून पीडित मुलाचे फोटो आणि व्हिडीओ काढत असे. तसेच पीडित मुलाचा मोबाईल हिसकावून घेत त्याच्याकडून सर्व पर्सनल माहिती व मोबाईल नंबर नोंदवून घेतली जायची. त्यानंतर पीडित मुलाकडून पैशांची मागणी केली जायची. जर मुलाने पैसे देण्यास नकार दिला, तर त्याचे खासगी व्हिडीओ आणि फोटो त्याच्या संपर्कातील लोकांना पाठवले जातील, अशी धमकी दिली जायची.

‘इस्लाम धर्म स्वीकार किंवा मॉडेलशी लग्न कर’

त्यानंतर पीडित मुलाकडे मॉडेलशी जबरदस्तीने लग्न करण्याची मागणी केली जायची. मॉडेल मुस्लिम असल्यामुळे तिच्याशी लग्न करण्यासाठी पीडित मुलालाही इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जायचे. त्याशिवाय पीडिताचा ताबडतोब सुंता (मुस्लिम धर्मातील एक विधी) करून घेण्यासाठी ते प्रयत्न करायचे. या संपूर्ण मागण्यांमुळे पीडित व्यक्ती घाबरून आरोपींना मोठ्या प्रमाणात पैसे देत असे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संपूर्ण घटनेत फसलेल्या एका पीडित तरुणाने हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली; ज्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत टोळीतील अनेकांना अटक केली आहे. या टोळीने १२ जणांकडून खंडणी घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या टोळीचा आणखी गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी शरणा प्रकाश बालिगेरा, अब्दुल खादर व यासीन यांना अटक केली होती. पोलिसांनी आणखी एक आरोपी नदीमचा शोध सुरू केला आहे.