जगभरामधील १८० हून अधिक देशांमध्ये करोना विषाणूचा फैलाव झाला आहे. अनेक देशांनी करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लॉकडाउनची घोषणा केली आहे. मात्र या लॉकडाउनदरम्यान अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळेच अनेकजण वर्क फ्रॉम होम करताना दिसत आहे. याच वर्क फ्रॉम होममुळे वेगवेगळ्या अ‍ॅपच्या माध्यमातून अनेकांना ऑफिसमधील मिटींग व्हिडिओ कॉलवर कराव्या लागत आहेत. मात्र यामध्येही अनेक गंमतीजंमती घडताना दिसत आहे. असंच काहीचं घडलं मायक्रोसॉफ्टच्या एका व्हिडिओ कॉलवरील मिटींगमध्ये.

झालं असं की मायक्रोसॉफ्टमधील कर्मचाऱ्यांची व्हिडिओ कॉलवर मिटींग सुरु होती. मिटींगला असणाऱ्या वयस्कर महिला बॉसने मिटींगमध्ये गंभीर चर्चा चालू असतानाच आपल्या फोनच्या स्क्रीनला हात लावला आणि व्हिडिओ कॉलवरील ‘पोटॅटो फिल्टर’ ऑन झाले. त्यामुळे मिटींगमध्ये असणाऱ्या इतर सगळ्यांना या महिला बॉसच्या जागी चक्क एक बटाटा दिसू लागला. रिचल या कर्मचाऱ्याने या मिटींगदरम्यानचा स्क्रीनशॉर्ट ट्विट केला आहे. या ट्विटला चक्क मायक्रोसॉफ्टच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन रिप्लाय आला आहे.

रिचेल आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, “मायक्रोसॉफ्टच्या मिटिंगदरम्यान आमच्या महिला बॉसने फिल्टर वापरुन स्वत:चे रुपांतर बटाट्यात करुन घेतलं. त्यानंतर हे सेटींग बंद कसं करायचं हो तिला कळत नव्हतं. संपूर्ण मिटींगमध्ये आम्ही बटाट्याबरोबर बोलत होतो.” रिचेलच्या बॉसचे नाव लिझेट ओकॅम्पो आहे. ती ‘अमेरिकन वे’ या मासिकाची राजकीय संपादकही आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लिझेट एका बटाट्यासारखी दिसत आहे.

३० मार्चला करण्यात आलेल्या या ट्विटला दोन लाख १४ हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. नऊ लाख ७ हजारहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. तर पाच हजार ३०० हून अधिक जणांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. काय आहे नेटकऱ्यांच म्हणणं पाहुयात…

अशा परिस्थितीत मिटिंग पूर्ण केली म्हणून तुमचं कौतुक

मी असतो तर जमीनीवर लोळून हसलो असतो

मी पण पुढच्या वेळेस असं करणार

आश्चर्याची बाब म्हणजे लिझेटही या व्हायरल झालेल्या ट्विटची मजा घेत असून तिनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “होय आहे मी बटाटा बॉस. माझ्यामुळे अनेकजण या अशावेळीही हसत आहेत याचा मला आनंद आहे. घरीच राहा आणि सुरक्षित राहा,” असं लिझेटने ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये लिझेटने #PotatoBoss हा हॅशटॅगही वापरला आहे.

दरम्यान हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुनही ट्विट करुन प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. “मजेदार आहे हे,” असं मायक्रोसॉफ्टने ट्विट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ऑफिसच्या व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलदरम्यान एक महिला कर्मचारी कॅमेरा ऑन ठेऊनच टॉयलेटला गेली होती. या कॉलदरम्यानही अन्य लोकांना हसू अनावर झाल्याचे दिसत होतं.