Viral Video: लोकांच्या निष्काळजीपणामुळे रेल्वेस्थानकावर अनेकदा अपघात होतात. काही जण धावत्या रेल्वेमध्ये चढायचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मोठे अपघात होतात. अशीच एक घटना आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मात्र या घटनेत मुलाने घाईगडबड न करता शांतपणे निर्णय घेतला आणि स्वतःचा जीव वाचवला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक थक्क झाले असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर एका सीसीटीव्हीमधला व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तो एक्स ट्विटरवर खूप पाहिला जात आहे. या व्हिडीओमध्ये स्थानकावर उभी असलेली रेल्वे हळूहळू सुटायला लागते, तेवढ्यात हातात खाण्याच्या वस्तूंचा ट्रे घेऊन एक मुलगा रेल्वेकडे धाव घेतो. तो रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो, कारण बहुतेक तो रेल्वेमध्ये सामान विकायला जाणार असतो.

पाहा व्हिडिओ

मुलगा रेल्वेमध्ये चढताना त्याचा पाय घसरतो आणि तो थेट ट्रेन आणि स्थानकाच्या मधल्या अरुंद जागेत खाली पडतो. हे पाहून आसपासचे लोक घाबरून जातात, कारण त्या क्षणी असं वाटतं की आता त्याचा जीव वाचणार नाही. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मुलगा घाबरून काहीही न करता शांतपणे जमिनीवर सपाट होऊन आडवा पडून राहतो. काही सेकंदांत संपूर्ण रेल्वे त्याच्यावरून निघून जाते. रेल्वे गेल्यानंतर लोक धावत येऊन त्याला वर ओढतात. देवाचे आभार की त्याला काहीही गंभीर दुखापत होत नाही. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये असा दावा केला आहे की, रुळाखाली पडलेला चिमुकला सुखरूपपणे वाचला आहे.

हा व्हिडिओ Shagufta Khan (@Digital_khan01) या खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी म्हटलं, “हा तर देवाचा चमत्कार आहे!” काहींनी लोकांना सावध करत लिहिलं, “फक्त एका सेकंदाची चूक जीवावर बेतू शकते.” काही लोक म्हणाले की, “या मुलाने दाखवलेलं शांतपणाचं वागणं हेच खरं उदाहरण आहे. घाबरून गोंधळ करण्यापेक्षा शांत राहिलं तर संकटातून बाहेर पडता येतं.”

ही घटना जरी भयानक असली तरी ती आपल्याला एक मोठा धडा शिकवते; निष्काळजी धाडस धोका निर्माण करतं, पण योग्य वेळी शांत राहून घेतलेला निर्णय आपला जीवही वाचवू शकतो.