गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर कंपनीचे कार्यकारी अधिकारी अर्थात CEO एलॉन मस्क यांनी घेतलेल्या एका पोलची जोरदार चर्चा आहे. या पोलमध्ये एलॉन मस्क यांनी आपण ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावं का? असा प्रश्न विचारला होता. त्यापुढे एक पाऊल जात जो काही निर्णय नेटिझन्स या पोलमधून देतील, तो मला मान्य असेल, असंही मस्क यांनी म्हटलं होतं. जवळपास ५७.५ टक्के ट्विटर युजर्सनं यावर ‘हो’चा कौल दिला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे आता एलॉन मस्क खरंच सीईओपदावरून पायउतार होणार का? अशी चर्चा सुरू झालेली असतानाच मस्क यांनी मोठं विधान केलं आहे. यासंदर्भात त्यांनी केलेलं ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमका काय होता हा पोल?

एलॉन मस्क यांनी दोन दिवसांपूर्वी, अर्थात १९ डिसेंबर रोजी एलॉन मस्क यांनी एक पोल ट्विटरवर सुरू केला होता. अशा प्रकारचे पोल मस्क यांनी याआधीही अनेकदा घेतले आहेत. त्या त्या वेळी आलेल्या निकालांवर मस्क यांनी लगेच किंवा कालांतराने अंमलबजावणीही केली आहे. त्यामुळेच या पोलवर जोरदार चर्चा सुरू झाली होती. कारण या पोलमध्ये मस्क यांनी आपण पायउतार व्हावं का? असा प्रश्न विचारला होता. “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हायला हवं का? या पोलचा येणारा निकाल मला मान्य असेल, मी तो पाळेन”, असं एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

कदाचित एलॉन मस्क यांच्याही अपेक्षेच्या उलट जाऊन ट्विटर युजर्सनं कौल दिला. तब्बल ५७.५ टक्के युजर्सनं पदावरून पायउतार होण्याच्या बाजूने मत दिलं. त्यामुळे हे निकाल मान्य करून एलॉन मस्क पदावरून पायउतार होतील का? अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली. त्यावर काल दिवसभर मस्क यांच्याकडून कोणतंही ट्वीट करण्यात आलं नाही. अखेर आज भारतीय वेळेनुसार सकाळी सातच्या सुमारास मस्क यांनी ट्वीट करत सूचक विधान केलं आहे.

स्वत:च राबवलेल्या सर्वेक्षणातून मस्क यांचा मुखभंग; ट्विटरच्या ‘सीईओ’पदावरून पायउतार होण्याचा बहुमताचा कौल

“ट्विटरच्या CEO पदाची जबाबदारी घेणारी कुणी मूर्ख व्यक्ती मला सापडली, की मी लगेच या पदावरून पायउतार होईन. त्यानंतर मी कंपनीच्या सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमचं काम पाहीन”, असं मस्क यांनी म्हटलं आहे. आता मस्क यांच्या या ट्वीटचा नेमका अर्थ काय? याची चर्चा सुरू झाली आहे. याचा अर्थ एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा मिश्किलपणे युजर्सचा कौल उडवून लावला की भावी वाटचालीसंदर्भात संकेत दिलेत, यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

ट्विटरमुळे मस्क यांचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट?

दरम्यान, एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी टेस्लाच्या प्रमुखपदी कायम राहायला हवं का? असा प्रश्न टेस्ला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या प्रमुख डॉ. रूबीन डेनहोल्म यांनी उपस्थित केला आहे. एका कंपनीचे सीईओ असताना दुसऱ्या कंपनीचं प्रमुखपद ताब्यात ठेवणं चुकीचं ठरू शकत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

मस्क यांनी बंद केलेली पत्रकारांची ‘ट्विटर’ खाती पुन्हा सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मस्क यांचं ट्वीट आणि त्यापाठोपाठ त्यांच्या टेस्लाच्या प्रमुखपदावर घेण्यात आलेला आक्षेप या मुद्द्यावरून आता नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.