रशियामध्ये एका फटाका फॅक्टरीला भीषण आग लागली, त्यामुळे रात्रभर आकाशात फटाक्यांची तुफान आतषबाजी होत होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत एकामागोमाग एक असंख्य रॉकेट आकाशात सुटताना दिसत आहेत. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, रशियाच्या दक्षिणेकडील रोस्तोव-ऑन-डॉन या शहरात 6 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाचे जवळपास 400 जवान रात्रभर ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होते.

रशियाच्या आपात्कालीन परिस्थिती मंत्रालयानेही या घटनेचा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना मंत्रालयाने जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन केलं होतं. स्थानिक माध्यमांनुसार, खराब इलेक्ट्रिक हिटरमुळे ही आग पहिल्यांदा बाजारात लागली. त्यानंतर आग पसरली आणि जवळच्या दोन मजली इमारतीने पेट घेतला. या इमारतीत नववर्षाच्या स्वागतासाठी सर्व फटाके साठवण्यात आले होते.


सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.