सध्या सोशल मीडियावर एका व्यावसायिकाने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची चर्चा सुरु आहे. कारण आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने एक व्हिडीओ शूट करुन आत्महत्या करण्यामागचं कारण सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव प्रशांत अग्रवाल (३०) असं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांतने त्याच्या भावाला व्हिडिओ कॉल केला होता, मात्र नेटवर्क नसल्यामुळे तो कट झाला. त्यानंतर प्रशांतने स्वतःचा एक व्हिडिओ बनवला आणि नदीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे घडली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रशांत म्हणतो, “मी १० लाखांचे कर्ज घेतलं आहे, ज्यांच्याकडून कर्ज घेतलं आहे ते लोक मला त्रास देत आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मी आत्महत्या करत आहे.” प्रशांतचा लहान भाऊ अंशुल अग्रवाल याने सांगितले की, बुधवारी त्याला प्रशांतचा व्हिडिओ कॉल आला होता, यावेळी तो म्हणाला, ‘मी हनुमान मंदिरात जाऊन आलो आहे, तुला हे सांगण्यासाठी फोन केला आहे की, मी आता आत्महत्या करण्यासाठी निघालो आहे.’ पण तो हे सांगत असतानाच फोन डिस्कनेक्ट झाला.
फोन कट झाल्यानंतर काही वेळाने अंशुलच्या फोनवर एक व्हिडिओ आला. जो प्रशांतने पाठवला होता. या व्हिडीओत प्रशांत म्हणतो, “कोटला चुंगी येथील रहिवासी अंशू, मोनू आणि पंकज यांच्याकडून मी १० लाखांचे कर्ज घेतलं आहे. शिवाय ते कर्ज मी फेडू शकलो नाही. त्यामुळे मला या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. आई आणि शिवानी, शक्य झालं तर मला माफ करा. मी माझ्या आयुष्याला कंटाळलो आहे. गुंडाच्या त्रासामुळे मी खूप अस्वस्थ झालो आहे. मी माझ्या गाडीमध्ये पाच हजार रुपये आणि मोबाइल ठेवून इधोन पुलावरून यमुना नदीत उडी मारणार आहे.”
दरम्यान, प्रशांतचा भाऊ अंशुलने या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. गोताखोरांच्या मदतीने पोलिसांना प्रशांतचा मृतदेह सापडला. तर फिरोजाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष कुमार तिवारी यांनी सांगितले की, अद्याप प्रशांतच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. त्यांनी गुन्हा दाखल करताच पुढील कारवाई केली जाईल.