Greater Noida Viral Video : रस्त्यावरून गाडी चालवताना काही तरुण असे काही धोकादायक स्टंट करतात की, ज्यामुळे स्वत:सह इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. सध्या दोन तरुणांच्या स्टंटबाजीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की, समाजात कायद्याचा धाक राहिला आहे की नाही. दरम्यान, अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल व्हिडीओत स्कॉर्पिओ चालवणारा एक तरुण पोलिसांचे बॅरिकेड दोरीच्या साहाय्याने आपल्या गाडीला बांधतो आणि सरळ घसपटत रस्त्याने घेऊन जातो. हे दृश्य पाहून कमेंट्समध्ये लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ नोएडातील असल्याचे सांगितले जात आहे.
व्हिडीओत पाहू शकता की, दोन तरुण रात्रीच्या वेळी भररस्त्यात धिंगाणा घालताना दिसत आहेत. स्कॉर्पिओमधून रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओत एक तरुण ड्रायव्हिंग सीट्वर बसला आहे, तर दुसरा पाठीमागच्या सीटवर बसून व्हिडीओ शूट करतोय, मागच्या सीटवर बसलेला तरुण एका हाताने गाडीला दोरीने बांधलेला पोलिसांचा बॅरिकेड धरून आहे आणि दुसऱ्या हाताने व्हिडीओ शूट करतोय. यावेळी रस्त्यावर फरपटत नेत असलेल्या बॅरिकेड्मधून आगीच्या ठिणग्या उडतायत.
याचवेळी स्कॉर्पिओमध्ये समोरच्या सीटवर एक बंदूकदेखील ठेवलेली दिसतेय, जी मुद्दाम दाखवण्यासाठीच ठेवलेली दिसतेय. दरम्यान, या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांच्या प्रतिमेलाच धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले जातेय.
दरम्यान, हा व्हिडीओ एक्सवर @SachinGuptaUP नावाच्या एका युजरने पोस्ट केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, देशातील सर्वात वेगाने वाढणारे शहर नोएडाचा हा व्हिडीओ पाहा. पोलिसांचे बॅरिकेड दोरीने बांधून एका कारने रस्त्यावरून ओढत नेले जात आहे. गाडीत शस्त्रेही ठेवण्यात आली होती. या पराक्रमाचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करून गोंधळ निर्माण करण्यात आला आहे, हे फक्त बॅरिकेड नाही तर थेट पोलिसांनाच ओढत नेत होते.
युजरने पुढे घटनेविषयी अपडेट देत लिहिले की, ‘नोएडा पोलिसांनी बॅरिकेडला दोरीने बांधून स्कॉर्पिओने ओढणाऱ्या निशांत पंडित, सौरभ पंडित, आर्यकेत यांना पकडले आहे आणि स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे. हा व्हिडीओ फेब्रुवारीचा आहे, जेव्हा हे तरुण लग्न समारंभातून परतत होते.’
नोएडामधील ही घटना पाहिल्यानंतर लोकही कमेंट सेक्शनमध्ये कठोर कारवाईची मागणी करत आहेत. एका युजरने लिहिले की, गुंडांचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे. दुसऱ्याने म्हटले की, बॅरिकेड ओढणे हे केवळ वाहतूक कायद्याचे उल्लंघन नाही तर पोलिसांच्या प्रतिष्ठेवर केलेला हल्ला आहे. शस्त्रे दाखवणे आणि व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट करत ते धोकादायक ट्रेंडला प्रोत्साहन देत आहेत.