चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ICC Champions Trophy 2017 मध्ये पाकिस्तानकडून भारताला १८० धावांनी पराभूत व्हावं लागलं. भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये या पराभवाचे दुःख आहेच, पण त्याहीपेक्षा अधिक वेदना पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढणारा हार्दिक पांड्या रन आऊट झाल्यानंतर झाल्या. सामन्यानंतर कोहलीसह इतर खेळांडूंवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. कोहली, रोहित, शिखर, युवराज आणि धोनी या सामन्यात ‘झिरो’ ठरले, पण एकटा हार्दिक हिरो ठरला. ‘भाऊ एकटाच नडला, वाघासारखा भिडला अन् पाकिस्तानच्या खेळाडूंचं टेन्शन भावानं जाम वाढवलं, पण शेवटी भावासोबत दगा झाला अन् भाऊ तंबूत परतला’ अशी चर्चा नाक्यानाक्यावर ऐकायला मिळत होती. अजूनही हार्दिकचं कौतुक केलं जात आहे.

त्याचं अस्सं झालं की, टीम इंडियाचे ‘वाघ’ एकापाठोपाठ आऊट होत होते. पण त्यानंतर आलेला हार्दिक पांड्या मात्र, मैदानावर टिच्चून खेळत होता. दबाव असतानाही पाकिस्तानच्या गोलंदाजांची त्यानं पार पिसं काढून टाकली होती. हार्दिक अजून १० ओव्हर जरी मैदानावर राहिला तर तो पाकिस्तान संघाला लोळवेल, असं सगळ्यांनाच वाटू लागलं होतं. पण ती एकच वेळ सगळ्यांना चटका लावून गेली. जाडेजानं चेंडू टोलवल्यानंतर १ धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तोच अंगाशी आला. नॉनस्ट्राईकला असलेला पांड्या बाद झाला. ही विकेटच तमाम भारतीय चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. आता या विकेटचं दुःख सगळ्यांनाच झालं. पण एका लहानग्या चाहत्याला इतकं वाईट वाटलं की, ते पाहून आपणही त्याचे ‘फॅन’ नक्कीच व्हाल. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानविरुद्ध पराभव झाल्यानंतर टीम इंडियातील खेळाडूंवर टीकेचा वर्षाव झाला, त्यापेक्षा कैकपटीनं या जबरा फॅनच्या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पांड्या धावबाद झाला अन् या चाहत्याला रडू अनावर झालं. तेव्हा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही बालपणीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की. ‘BabaChu’ या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत या व्हिडिओला ७६ हजारांहूनही अधिक शेअर्स आहेत