मुंबईतील वाहतूक कोंडी, रिक्षा-टॅक्सीची वाट पाहणे आणि ट्रॅफिकमध्ये अडकून प्रवास करणे हे शहराच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. मात्र, मुंबई मेट्रोच्या नव्या अ‍क्वा लाईनमुळे (मेट्रो लाइन ३) या सगळ्याला एक सुखद पर्याय उपलब्ध झाला आहे. अलीकडेच मुंबईत राहणाऱ्या एका जपानी नागरिक महिलेनं या नव्याने सुरू झालेल्या मेट्रोचा पहिल्यांदाच अनुभव घेतला आणि तो सोशल मीडियावर शेअर करताच तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि वेळेवर अगदी जपानसारखं! अशा शब्दांत तिनं आपला अनुभव मांडला आहे.

या व्हिडीओमध्ये ती महिला सगळ्यांना म्हणते, “चला माझ्यासोबत, नवीन मुंबई मेट्रोमध्ये पहिली सफर करूया!” अ‍क्वा लाईन नुकतीच सुरू झाली आहे आणि ही मुंबईची पहिली अंडरग्राउंड मेट्रो आहे असं ती उत्साहाने सांगते. पुढे ती सांगते की, तिला घरी जायचं होतं, पण गूगल मॅप्सने गाडीने दीड तास लागणार असल्याचं दाखवलं. ते पाहून तिने लगेच ठरवलं – “गाडीत अडकून बसण्यापेक्षा नवीन मेट्रोच ट्राय करूया!

पाहा व्हिडिओ

मेट्रोमध्ये बसल्यानंतर ती सतत सगळ्या गोष्टीचं कौतुक करताना दिसते. ती म्हणते, “हा रूट तर जबरदस्त आहे! बांद्रा, बीकेसी, एअरपोर्ट… सगळे महत्त्वाचे स्टॉप कव्हर होतात” आणि पुढे हसतच म्हणते, “मला तर खरंच जपानमध्ये असल्यासारखं वाटलं — इतकी स्वच्छता, सुरक्षितता आणि वेळेवर धावणारी मेट्रो!” त्या स्थानकांचं इंटिरियर पाहून खूश होते. प्रशस्त प्लॅटफॉर्म, चमकदार भिंती आणि महिलांसाठी असलेला वेगळा डबा पाहून ती म्हणते, “खूप छान सोय केलीये! थोड्या वेळाने ती मरोळ स्थानकावर उतरते, जेथून लाइन १ (घाटकोपर ते वर्सोवा) ला कनेक्शन मिळतं. तिच्या बाजूलाच विजय नावाचा एक प्रवासी असतो, तो तिला पुढचा रस्ता दाखवतो. व्हिडीओच्या शेवटी ती म्हणते, “ज्या शहरात चांगली मेट्रो आणि चालण्यासारखे रस्ते असतात, ते शहर खरोखर प्रगती करतंय असं समजायचं.”

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुंबईकरांनी आणि अनेक तरुणांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या. काही जण अभिमानाने म्हणाले, “आपली मुंबई आता खरंच जागतिक दर्जाचं शहर बनत चालली आहे!” काहींनी थट्टेने लिहिलं, “जर जपानी लोकांनाही आपली मेट्रो आवडली, तर मग आपण तर पक्के फॅन झालो!” तर काही लोकांनी सल्ला दिला, “मेट्रो अशीच स्वच्छ ठेवायची असेल तर प्रवाशांनीही नीट वागायला हवं.