Leopard Attack in Village: थरार हा शब्द इथे अगदी तंतोतंत लागू पडतो. कारण- कल्पना करा की, मध्यरात्रीचं शांत गाव, घराच्या गेटवर बसलेला विश्वासू कुत्रा आणि तेवढ्यात अंधारातून उडी मारत येतो एक बिबट्या. क्षणात तो कुत्र्याच्या गळ्यावर झडप घालतो आणि काही सेकंदांत त्याला ओढत नेतो… आणि सगळं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतं. होय, ही खरी घटना आहे जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फ नारायणगाव परिसरातली. सध्या या भागात बिबट्यांचा वावर एवढा वाढला आहे की, लोक रात्री बाहेर पडायलाही घाबरतात. ग्रामीण भागात प्राणी आणि माणसं एकत्र राहतात; पण आता ही समतोल रेषा धोक्यात आली आहे.

या घटनेतील व्हिडीओ आता सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम व X (Twitter) वर हा व्हिडीओ हजारोंनी शेअर केला जातो आहे. ३३ हजारांहून अधिक वेळा ही क्लिप पाहिला गेली असून, नेटिझन्सच्या अंगावर काटा आणणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत, “हे पाहून झोप उडाली”, “बिबट्याचा वेग पाहून विश्वास बसत नाही”, “प्रशासन झोपेत आहे का?” असं लोक विचारतायत.

जुन्नर परिसरातील जंगलात बिबट्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढल्याचं वन विभागानंही मान्य केलं आहे. पण, प्रश्न असा आहे की हे बिबटे मानवी वस्त्यांमध्ये का शिरत आहेत? तज्ज्ञ सांगतात, जंगलतोड, शिकार कमी होणे व नैसर्गिक अधिवास नष्ट होणं हीच मुख्य कारणं आहेत. प्राणीही जगण्यासाठी झगडत आहेत आणि त्यामुळे ते आता गावात येऊन पाळीव प्राणी, कोंबड्या किंवा मेंढ्या यांच्यावर हल्ले करतायत.

या घटनेतल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, कुत्रा घराची राखण करत होता; पण काही कळायच्या आत बिबट्यानं गेट ओलांडून त्याच्यावर झडप घातली. क्षणभरात सगळं संपलं. एक सेकंदही कुत्र्याला प्रतिकाराची संधी मिळाली नाही. हीच बिबट्याची चपळाई आहे. तो शांत, वेगवान आणि अत्यंत बुद्धिमान शिकारी आहे.

लोकांमध्ये मात्र आता भीतीचं वातावरण आहे. “रात्री बाहेर जाणं बंद केलंय”, “लहान मुलांना अंगणात खेळू देत नाही”, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. काहींनी तर आपल्या घराबाहेर लोखंडी गेट आणि मोठे दिवे बसवले आहेत.

पण, हा प्रश्न फक्त जुन्नरपुरता मर्यादित नाही. काही दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातही बिबट्यांचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. म्हणजेच ही समस्या आता ग्रामीण नव्हे, तर शहरी भागातही पसरतेय.

येथे पाहा व्हिडीओ

या थरारक घटनेनं पुन्हा एकदा आठवण करून दिली की, निसर्गाशी केलेला प्रत्येक अन्याय शेवटी आपल्यालाच भोगावा लागतो. बिबट्या निर्दयी नाही, तर तो फक्त जगण्यासाठी झगडतो आहे. पण, या संघर्षात माणूस आणि प्राणी दोघेही जखमी होतायत हे निश्चित.