बुधवारी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये तीन कॅच पकडणारा रवींद्र जाडेजा चर्चेत आला आहे. पण तो त्याच्या कॅचेसमुळे चर्चेत आला नसून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आला आहे. भारतानं बुधवारी न्यूझीलंडचा तब्बल ७० धावांनी पराभव करत वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेता संघ रविवारी १९ नोव्हेंबर रोजी टीम इंडियाशी अहमदाबाद स्टेडियमवर दोन हात करेल. मात्र, बुधवारी भारतीय संघानं न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर धोनीचं एक ट्वीट तुफान व्हायरल होऊ लागलं आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं २००७ आणि २०११ च्या अनुक्रमे टी२० व एकदिवसीय विश्वचषक स्पर्धांमधील विजेत्या भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे यंदा टीम इंडिया विजेतेपदाच्या नजीक पोहोचू लागली असताना महेंद्रसिंह धोनीचं नेतृत्व, भारतानं जिंकलेले विश्वचषक व त्या विजेत्या संघातील खेळाडू यांचीही चर्चा होत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जमध्ये अव्वल कामगिरी करणारा रवींद्र जाडेजा सध्याच्या भारतीय संघात असून त्याच्यासाठी धोनीनं जवळपास १० वर्षांपूर्वी केलेलं एक ट्वीट सध्या व्हायरल होऊ लागलं आहे.
रवींद्र जाडेजाचे तीन अफलातून झेल!
रवींद्र जाडेजानं बुधवारी झालेल्या सेमीफायनलमध्ये अनुक्रमे डेरिल मिचेल (१३४ धावा), ग्लेन फिलिप्स (४१ धावा) व मार्क चॅपमेन (२ धावा) यांचे झेल टिपत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. रवींद्रनं सीमारेषेवर टिपलेले झेल कौतुकाचा विषय ठरत असून त्याचसाठी धोनीचं हे ट्वीट चाहते पुन्हा रीट्वीट करू लागले आहेत.
काय आहे या ट्वीटमध्ये?
महेंद्र सिंह धोनीनं ९ एप्रिल २०१३ रोजी दुपारी हे ट्वीट केलं होतं. “सर जडेजा कॅच पकडण्यासाठी अजिबात धावाधाव करत नाहीत. तर उलट बॉल स्वत: त्यांना शोधत येतो आणि त्यांच्या हातात स्थिरावतो”, असं धोनीनं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काही युजर्सनी त्यावर “माही भाईने बोला, तो बस फिर उसके आगे कुछ नही”, असं ट्वीट केलं आहे. तर काहींनी धोनीशी सहमती दर्शवताना “जाडेजाकडे नक्कीच चुंबकीय शक्तीसारखे हात आहेत. मैदानावर त्याचा वावर एखाद्या जादुगाराप्रमाणे असतो”, असं ट्वीट केलं आहे.