Mumbai Airport Fight Video : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यामध्ये विमानतळावरील सुरक्षा रक्षक आणि वाहनचालक यांच्यामध्ये पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर काही वेळातच तुफान हाणामारीत झाले, ज्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांना रस्त्यावर लोळवून कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना विमानतळाच्या पार्किंग परिसरात घडली, ज्यात एका वाहनचालकाने वाहन चुकीच्या पद्धतीने पार्क केल्याने विमानतळावरील सुरक्षा रक्षकाने त्याला हटकले. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळातच शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सुरक्षा रक्षक आणि वाहनचालकांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये त्यांनी एकमेकांना चक्क कपडे फाटेपर्यंत मारले आणि जमिनीवर लोळवून तुडवले.
या घटनेमुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी तिथे एका पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेत हाणामारी रोखण्याचा प्रयत्न केला; पण हाणामारी करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एकटा पोलीस कर्मचारी काहीच करू शकला नाही. पण घटनेची माहिती मिळताच सहारा पोलिसांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षक आणि वाहनचालक अशा दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण हा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत तपास केला जात आहे. कारण- विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.