Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमधून प्रवास हा कितीही खडतर असला तरीही जर तुमचे मोठमोठे ग्रुप असतील तर हा प्रवासही अनेकदा पिकनिकसारखा होऊ शकतो. आता पिकनिक म्हटलं की खाणं-पिणं होणारच, हो ना? यातील कुठल्याच गोष्टीला विरोध करण्याचं कारण नाही. पण अनेकदा जेव्हा खाऊन पिऊन होतं तेव्हा कागदी प्लेट्स, पेपरचे कप, प्लॅस्टिक असं सगळं सरळ खिडकीतून बाहेर फेकलं जातं. विशेष म्हणजे यात प्रवाशांना काहीच गैर वाटत नाही. यापूर्वी अनेकदा या कचऱ्यामुळे रेल्वेच्या रुळावर पावसाळ्यात पाणी साचल्याने कित्येक तास प्रवाशांचा खोळंबा झाला होता पण तरीही निर्धास्तपणे हा कचरा सरळ खिडकीतून बाहेर टाकला जातो. पण हा कचरा जातो कुठे हे तुम्हाला माहित आहे का?
मध्य रेल्वेने आज एक पोस्ट करून लोकलमधून बाहेर टाकला जाणारा कचरा कसा उचलला जातो याची नवी पद्धत दाखवली आहे. या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सनी भरपूर कमेंट केल्या आहेत. लोकांच्या बेजबाबदारपणामुळे लोकांना स्वतःचा जीव असा धोक्यात घालावा लागतो असेही काहीजण म्हणत आहेत. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक महिला ब्लोअरने कचरा उडवत आहे. ब्लोअर हे असे साधन असते ज्यात वेगाने हवा बाहेर टाकली जाते जी कचरा उडवून लावते. सोप्या शब्दात सांगायचं तर, व्हॅक्युम क्लिनरच्या अगदी उलट काम ही मशीन करते.
Video: मुंबई लोकलच्या मार्गावर नवी सिस्टीम
हे ही वाचा<< ISRO अध्यक्ष एस. सोमनाथ यांचा महिन्याचा पगार सांगत हर्ष गोएंका यांचे ट्वीट; विचारलं, “हे योग्य आहे का?”
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी ही पद्धतच चुकीची असल्याचं म्हटलं आहे. कचरा उचलण्याच्या ऐवजी तो फक्त उडवून पुढे ढकलला जात आहे याला काय अर्थ आहे? असा प्रश्न नेटकरी करत आहेत. एखादी फास्ट ट्रेन जर बाजूने गेली तरी हे काम होऊ शकतं असंही काहींनी लिहिलं आहे. तर काहींनी या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेची काय काळजी घेतली जातेय यावर प्रश्न केला आहे. रेल्वेने याचे उत्तर देताना हे काम रात्री रेल्वेसेवा बंद असताना केलं जातं असं सांगितलं आहे. तुम्हाला ही नवी सिस्टीम कशी वाटतेय आणि यावर अन्य काही उपाय तुम्ही सुचवू शकता का हे कमेंट करून नक्की सांगा.