आधी प्रेम, मग या नात्यात तिस-याच्या मधे येण्याने होणारा प्रेमभंग, आणि प्रेमभंगाचा सूड उगावण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठणे अशा बातम्या वारंवार वाचण्यात, ऐकण्यात येतात. पण या गोष्टी फक्त माणसात घडतात असे नाही. प्रेमभंगाचा त्रास मूक्या जनावरांनाही तितकाच होता. जेव्हा विश्वासाने घरट्याची जबाबदारी सोडून गेलेल्या नर जोडीदाराला आपली मादी तिस-यासोबत आढळते तेव्हा काय होते याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घरी परतल्यावर मादी दुस-याच नरासोबत दिसली या रागाने एका पेंग्विनने प्रतिस्पर्धी नराला अगदी बोचून रक्तबंबाळ केले. ‘नॅशनल जिओग्रॉफीक’ने सोशल मीडियावर अपलोड केलेला हा काही सेकंदाचा व्हिडिओ जगभरातल्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा चॅनेल पेंग्विन पक्षाच्या जीवनशैलीवर एक महितीपट बनवत होता. त्या चित्रिकरणातील हा व्हिडिओ आहे. पेंग्विन नर आणि मादा हे दोन्ही आळीपाळीने आपल्या घरट्याचे आणि पिल्लांचे संगोपन करतात. अंडे उबवण्यापासून ते पिल्लांचे संगोपन करण्याचे काम नर आणि मादी वाटून घेतात. अंडी दिल्यानंतर ती उबवण्याचे काम अनेकदा नर पेंग्विन करतात. या काळात मादी समुद्रात जाऊन नरासाठी अन्न आणण्याचे काम करते. नर आणि मादी मिळून घरटे बनवतात. यावेळी कोणा एकाला अन्न आणण्यासाठी समुद्रात जावे लागते. हे चित्रिकरण देखील त्यावेळी केले गेले. मादीसाठी अन्न घेऊन परतत असताना आपल्या जोडीदाराला दुस-या नरासोबत पाहिल्याने नराचा राग अनावर झाला आणि या दोन्ही प्रतिस्पर्धीचे जीवघेणे युद्ध सुरू झाले. ‘नॅशनल जिओग्राफीक’ने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लाखो लोकांनी तो शेअर केला.

अखेर जीवघेणे द्वंद्व थांबवून या नरांनी मादीपुढे दगड ठेवला. पेंग्विन पक्षी जोडीदार निवडताना त्याच्यापुढे दगड ठेवतो. जर पेंग्विनने तो दगड चोचीत उचलला तर हे दोन्ही पक्षी आयुष्यभर एकत्र राहतात. यावेळी देखील तसेच झाले, आता मादी पेंग्विनने नक्की कोणासोबत राहण्याचे ठरवले हे पाहण्यासाठी मात्र तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.