पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून दरात रोज वाढ होत आहे. वाढत्या भावामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून वेगळ्याच घटना घडत आहेत. या घटनांमुळे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या दोन महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनचालक कर्मचाऱ्यांना कारची टाकी फूल करायला सांगतात आणि टाकी फुल झाल्यानंतर पैसे न देताच ते भरधाव वेगाने निघून जातात. असा प्रकार दोन महिन्यापूर्वी शेगाव येथील बाबजी पेट्रोल पंप व गजानन सर्विस सेंटर येथे घडलाय. त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

शेगाव येथे कारमध्ये बसलेल्या काही अनोळखी व्यक्तींनी पेट्रोल पंपावर कारची टाकी फुल करून घेतली आणि तेथून पोबारा केला. त्यानंतर नांदुरा, खामगाव आणि दोन दिवसापूर्वी आंबेटाकळी येथील दोन पेट्रोल पंप, अशा विविध ठिकाणी असा प्रकार घडल्याचं समोर आलंय. पेट्रोल पंपावर कारची टाकी फुल करून पळ काढला जातो. कारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्या तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने त्यांना आजपर्यंत कुणीही ओळखलेले नाही. मात्र हे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक असावेत आणि गुन्ह्यात ही कार वापरली जात असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांसंदर्भात आजपर्यंत जिल्ह्यात चार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, तर अजूनही काही तक्रारी दाखल होणार असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पूर्णतः भितीचे वातावरण पसरले आहे. अशा घटना घडल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कपात होत आहे, त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. या चोरीच्या प्रकरणांची पोलिसांनी तातडीने दखल घेत या टोळीचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी करत आहेत.