राजस्थानमधील प्रसिद्ध पुष्कर मेळा दरवर्षी देश-विदेशांतील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. रंगीबेरंगी संस्कृती, लोककला आणि प्राण्यांचे आकर्षक प्रदर्शन पाहण्यासाठी हजारो लोक येथे जमतात. याच मेळ्यातील एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना जितकी गमतीशीर वाटते, तितकीच धक्कादायकदेखील आहे. एका जोडप्याने उंटावरून आनंदाने प्रवास सुरू केला, पण क्षणात घडलेल्या एका घटनेने सर्वांच्या चेहऱ्यावरील हास्य पुसून टाकले.
या व्हिडीओमध्ये पुष्कर मेळ्यात एक जोडपे उंटावर स्वार होताना दिसत आहे. सुरुवातीला सगळं सुरळीत चाललंय असं वाटतं. उंट हलकासा बसला आहे आणि गाईड त्याला उभा करण्याची तयारी करीत आहे; पण पुढच्याच क्षणी उंट झटकन उभा राहतो, ज्यामुळे त्या दोघांचाही तोल जातो आणि ते दोघेही एकाच वेळी जमिनीवर आपटतात. आजूबाजूला उभे असलेले लोक हे दृश्य पाहून एकीकडे थक्क तर दुसरीकडे हसत प्रतिक्रिया देतात. काही जण या प्रसंगाचा व्हिडीओ काढू लागतात, तर काही मदतीसाठी धाव घेतात.
पाहा व्हिडिओ
थोड्या वेळानंतर लक्षात येतं की महिला जखमी झाली आहे, त्यामुळे उपस्थित लोक लगेच तिला उचलून बाजूला नेतात. उंटालादेखील सावरायचा प्रयत्न त्याचा चालक करताना दिसतो. ही संपूर्ण घटना काही सेकंदात घडते. सोशल मीडियावर या व्हिडीओखाली विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटले, “महिलेला वेदना होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे तरी लोक हसत आहेत ते पाहून वाईट वाटलं.” दुसऱ्याने लिहिलं, “सुदैवाने ती बाजूला पडली, नाही तर बाजूच्या बाईकवर आदळली असती तर मोठं नुकसान झालं असतं.” आणखी एकाने म्हटलं, “यात हसायचं काय आहे? उंटदेखील सजीव आहे, तो कदाचित थकलेला किंवा भुकेला असेल, कृपया प्राण्यांना विश्रांती द्या.”
तरीही काहींनी याला “फनी मोमेंट ऑफ द इयर” म्हणून संबोधलं आणि पडल्यानंतरही चेहऱ्यावर हास्य घेऊन उभे राहिल्याने या जोडप्याच्या धाडसाचे कौतुक झाले. हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी नाही तर प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे महत्त्वदेखील अधोरेखित करतो. उंट किंवा कोणत्याही प्राण्यावर स्वार होताना सावधगिरी बाळगणं किती गरजेचं आहे, हे या घटनेतून स्पष्ट होतं. पुष्कर मेळ्याच्या गजबजलेल्या वातावरणात घडलेला हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
