अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सुरू होती ते भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन बांधून तयार झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. गुरुवारी रेल्वे मंत्री यांनी अहमदाबादमधील साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब येथे बांधलेल्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन टर्मिनलचा एक नेत्रदीपक व्हिडीओ शेअर केला. तसेच या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
बुलेट ट्रेनचा प्रवास भारतीयांसाठी खास ठरणार आहे, तर देशातले हे पाहिलं बुलेट ट्रेन स्टेशन साबरमतीत बांधण्यात आले आहे. हे रेल्वेस्थानक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव आणि सुविधा देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन तयार करताना सांस्कृतिक वारश्यासह आधुनिक वास्तुकलेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. एकदा तुम्हीसुद्धा बघा भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन…
व्हिडीओ नक्की बघा :
तसेच ही बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई या दरम्यान धावणार आहे. तसेच बुलेट ट्रेनने हा प्रवास अवघ्या २.०७ तासांत पूर्ण केला जाऊ शकणार आहे. या प्रकल्पासाठी जपानची मदत घेण्यात आली आहे. आर्थिक मदतीबरोबरच जपानकडून तांत्रिक मदतदेखील मिळाली आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरसाठी अंदाजे खर्च १.०८ लाख कोटी रुपये आहे, ज्यामध्ये केंद्र १०,००० कोटी देण्यास वचनबद्ध आहे; तर गुजरात आणि महाराष्ट्र प्रत्येकी पाच हजार कोटी योगदान देतील. उर्वरित निधी जपानकडून कर्जाद्वारे किमान ०.१ टक्के व्याजदराने केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
या प्रकल्पाचा शुभारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये केला होता, जे आता यशस्वीरित्या बांधून तयार झाले आहे.सोशल मीडियावर हा व्हिडीओ रेल्वेमंत्री यांच्या एक्स (ट्विटर) @AshwiniVaishnaw या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे टर्मिनल! साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब, अहमदाबाद,” अशी त्यांनी पोस्टला कॅप्शन दिली आहे.