सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्काच बसतो. असे व्हिडीओ आपल्या कायम लक्षात राहतात. या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. अशामध्ये अनेकदा स्टंटचे व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात.

लोक कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर जीवघेणे स्टंट करत असतात. मुद्दाम माहीत असून आयुष्यावर बेततील अशा गोष्टी करायला जातात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि काही व्ह्युज व लाइक्ससाठी ते स्वत:चा जीव धोक्यात टाकायला मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या अशाच एका तरुणीने एक जीवघेणा स्टंट केलाय. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

मस्करी बेतली जीवावर

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुण मुलगी जिन्यावर स्टंट करताना दिसतेय. जिन्यांच्या बाजूला असलेल्या रेलिंगवर बसून घसरत घसरत मस्करीत ती स्टंट करताना दिसतेय. पण, ही मस्करी तिच्याच जीवाशी बेतली. रेलिंगवरून खाली घसरत असताना अचानक तिचा तोल गेला आणि तशीच उलटी ती खाली कोसळली. व्हिडीओच्या कॅप्शननुसार ती इमारतीच्या १० व्या मजल्याच्या जिन्यावरून खाली कोसळली, असं दिसतंय.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @__.magnanimous अकांउटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला ‘१० मंजिल की उचाई से गिर गई’ (दहा मजल्यांच्या अंतरावरून खाली पडली), अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तर व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल ५.८ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

तरुणीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “बापरे आयुष्याबरोबर अशा प्रकारे खेळणं चुकीचं आहे.” दुसऱ्याने कमेंट करीत लिहिलं, “जे तिच्या नशिबात लिहिलेलं तेच घडलं.” तिसऱ्यानं, “जर माहीत आहे की असं केल्यानं मृत्यू ओढवू शकतो; मग असं करायचंच कशाला” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “जे आयुष्यात सगळ्या गोष्टी मस्करीत घेतात, त्यांच्याबरोबर असंच होतं.”