जॉबसाठी एखाद्या ठिकाणी रेझुमे (Resume) पाठविणे, कॉलेजमधून हॉल तिकीट किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी पर्सनल खात्यावर मेल येणे ते ऑफिसमधील अनेक कामांसाठी आपण सगळेच बहुतांशी गूगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) वापरतो. काल याच जीमेलला (Gmail) २० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आज गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी जीमेलच्या (Gmail) या २० वर्षांच्या प्रवासावर एक नजर टाकली आहे.

Gmail ला २० वर्षे पूर्ण झाली म्हणून गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ‘एप्रिल फूल डे’पासून सुरू झालेल्या ई-मेल सेवेच्या उल्लेखनीय प्रवासावर प्रकाश टाकला. आज त्यांनी एक्स (ट्विटर)वर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यात असे लिहिले आहे की, “२० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा @जीमेल! मला या गोष्टीचा आनंद आहे की, हा ‘एप्रिल फूल डे’ प्रँक नव्हता” ; असे लिहून त्यांनी पोस्ट केली आहे.

हेही वाचा…‘गूगल पे’ ची मूळ कल्पना कुणाची ? भारतात ऑनलाईन पेमेंटची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या…

पोस्ट नक्की बघा :

गूगलचे सह-संस्थापक लॅरी पेज आणि सेर्गे ब्रिन यांनी २०१४ मध्ये १ एप्रिल रोजी जीमेल (Gmail) लाँच केले होते. जीमेल ही मोफत सेवा म्हणून लाँच करण्यात आली होती; ज्यात प्रत्येक अकाउंटसाठी सुमारे १३,५०० मेल (Mail) स्टोअर करण्याची सुविधा आहे. Google च्या माजी कार्यकारी मारिसा मेयर म्हणाल्या, जीमेलमध्ये पुढील तीन एस (S) म्हणजेच स्टोरेज, सर्च, स्पीड या तिघांनी वापरकर्त्यांना जोडून ठेवण्यास मदत केली.

पेज आणि ब्रिन यांनी १ एप्रिल रोजी जेव्हा जीमेल लाँच करण्यात आले आहे, अशी पोस्ट केली गेली तेव्हा कोणालाच विश्वास बसला नव्हता. कारण- ते नेहमी १ एप्रिल रोजी मजेशीर खोड्या करायचे. त्यांनी ‘एप्रिल फूल डे’निमित्तच्या प्रँकमध्ये चंद्रावरील कोपर्निकस संशोधन केंद्रासाठी नोकरीची संधी आहे, अशी पोस्ट; तर एका वर्षी गूगलवर ‘स्क्रॅच आणि स्निफ’ हे फीचर आणणार, अशीदेखील पोस्ट केली होती. पण लवकरच वापरकर्त्यांना कळले की, Gmail हा विनोद नाही आणि पुढील अनेक वर्षांसाठी जीमेल या ॲपने संवाद (communication) साधण्याच्या पद्धतीने क्रांती घडवून आणली.

जीमेल (Gmail) लाँच झाल्यानंतर काही वर्षांत त्यांनी वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट ॲप्लिकेशन, गूगल मॅप व गूगल डॉक्स आदी ॲप्स लाँच करण्यात आली. तसेच क्रोम, ब्राउझर आणि जगातील बहुतेक स्मार्टफोन्सना सामर्थ्य देणारी ॲण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम लाँच करण्यापूर्वी त्याने यूट्यूबदेखील मिळवले, असा जीमेलचा २० वर्षांचा प्रवास आहे.