टेस्लाच्या गाड्या अजून भारतीय रस्त्यांवर धावत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून टेस्ला कंपनीची भारतासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. लवकरच भारतात टेस्लाच्या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध होतील. यासाठी कंपनी ट्रायल रन देखील सुरु केलं असून ठिकठिकाणी गाड्या चार्जिंगसाठी स्टेशन उभारण्याची रणनिती आखली आहे. असं असलं तरी या गाड्यांबाबत भारतीयांना प्रचंड कुतूहूल आहे. कारण गाड्यांच्या फिचर्सबाबत ऐकून, वाचून कमालीची उत्सुकता वाढली आहे. गाडीतील ऑटोपायलट फिचरबाबत नेहमीच चर्चा असते. आता या फिचरमुळे टेस्लाची गाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गाडी ऑटोपायलट मोडवर ठेवून एका महिलेने गाडीतच मुलीला जन्म दिला आहे.
३३ वर्षीय यिरन शेरी या पती कीटिंग शेरीसोबत अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे राहतात. यिरन गरोदर होती आणि तिच्या टेस्ला मॉडेल ३ इलेक्ट्रिक कारने कीटिंगसोबत हॉस्पिटलला जात होती, पण वाटेतच यिरनला प्रसूती वेदना होऊ लागल्या. वेदना वाढत गेल्याने तिने कारमध्येच मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. पत्नीला आधार देण्यासाठी कीटिंगने कार ऑटोपायलट मोडवर ठेवली आणि पत्नीला मदत करण्यास सुरुवात केली. गाडी आपल्या गतीने पुढे जात राहिली. दरम्यान, मुलाचा गाडीत सुखरुप जन्म झाला. त्यानंतर ऑटो पायलट मोडवर असलेली गाडी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेथे नर्सने कारकडे आली आणि सीटवरील बाळाची नाळ कापली. सोशल मीडियावर लोक या बाळाला ‘फर्स्ट टेस्ला बेबी’ म्हणत आहेत. बाळाच्या जन्मानंतर महिलेच्या पतीने ट्विट करत माहिती दिली की, “माझ्या पत्नीने धैर्याने आमच्या टेस्ला मॉडेल ३ च्या पुढील सीटवर बाळाला जन्म दिला. आम्ही हॉस्पिटलला जात होतो तेव्हा हे घडले.”
ऑटोपायलट मोडवर ड्रायव्हर गाडी पूर्णपणे सेल्फ ड्रायव्हिंग मोडमध्ये चालते. चालकाला गाडी चालवण्याची गरज भासत नाही. ऑटोपायलट मोडमध्ये वाहनाचा वेग, सभोवतालची स्थिती, ब्रेकिक आणि पार्किंग यासारख्या गोष्टी गाडी स्वत: करते.