Thar Car Stunt Viral Video: वाहनांबरोबर स्टंटबाजी करण्याचे प्रकार काही थांबायचे नावच घेत नाहीत. अशा प्रकारांमध्ये पोलिसांकडून चालकांविरोधात गुन्हा केला जातो, काही वेळा कठोर कारवाईही केली जाते. मात्र, त्यानंतरही स्टंटबाज वाहनचालक स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. त्यात काही दिवसांपासून वाहन अपघातांच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे सामान्य नागरिकांनी रस्त्यावरून चालायचे की नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अशातच समाजमाध्यमांवर एका थार कारसह स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित थारचालक रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांबरोबर असे काही वागतोय की, जे पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ नोएडा कोतवाली सेक्टर-१२६ भागातील एनिटी युनिव्हर्सिटीबाहेरील आहे. या व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी स्टंट करणाऱ्या या वाहनचालकावर ३५ हजार रुपयांचे चलन बजावले आहे. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.

थार चालकाचे भररस्त्यात संतापजनक कृत्य

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका काळ्या रंगाच्या थार कारवर गुर्जर असे लिहिले आहे. या कारचा चालक रस्त्याने चालत असलेल्या अनेक तरुणींच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी तरुणी घाबरून कारसमोर लगेच बाजूला होतात. त्यानंतर तो चालक काही तरुणांबरोबरही तसेच करतो. थारचालक अतिशय चुकीच्या पद्धतीने वाहन चालवत रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांजवळ वाहन नेतो आणि जोरात ब्रेक दाबतो. अशा प्रकारे चालक रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना नाहक त्रास देत, स्वत:ला अघोरी आनंद मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

पैसे कमावण्यासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट जुगाड; रिक्षाला लावले लोहचुंबक अन्…; पाहा VIDEO

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नोएडा पोलिसांनी त्याची दखल घेत, वाहनाविरोधात ३५ हजार रुपयांचे ई-चलन जारी केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाहनाची नंबर प्लेट HR30z4504 अशी आहे. या नंबर प्लेटच्या आधारे पोलिसांनी त्याच्याविरोधात वाहतूक नियमांचे उल्लंघन, काळी काच वापरणे, चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे, लोकांना त्रास देणे यांसाठी भादंवि कलम २७९ / ५०४ / ३३६ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच आरोपीला पकडण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. मात्र, या घटनेनंतर आता नेटीझन्स तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

अनेकांनी थार चालकाविरोधात फक्त ई-चलन घेण्याशिवाय कठोर पोलीस कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करीत, त्याचे वाहन जप्त करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारे अनेकांनी तीव्र शब्दांत वाहनचालकाविरोधात संताप व्यक्त केला आहे.