Nagpur Flexible Thief Pulls Off A Bizarre Heist Video Viral : चोरीच्या घटनांचे अनेक सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात महाराष्ट्रातील नागपूरमधून अशाच एका चोरीच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक चोर ज्या पद्धतीने चोरी करतोय, ती पद्धत तुम्ही आजपर्यंत कधी पाहिली नसेल; ज्यामुळे लोक हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत.

नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामश्री बियर बारमध्ये ही चोरीची घटना घडली, जिथे ६ जूनच्या मध्यरात्री चोराने चक्क कॅश काउंटरच्या छोट्याश्या खिडकीतून बिअर शॉपमध्ये प्रवेश केला आणि दुकानात ठेवलेले २५ हजार रुपये चोरी केले. चोरीच्या घटनेचा हा व्हिडीओ दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसतंय की, चोर बिअर शॉपमधील कॅश काउंटरची पाहणी करतो, यानंतर काही वेळाने तो आपल्या लवचिक शरीराचा फायदा घेत कॅश काउंटरच्या खिडकीतून बिअर शॉपमध्ये प्रवेश करतो आणि तिथे ठेवलेले पैसे चोरतो.

पोलिसांना या चोरीच्या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनाही प्रश्न पडला की, दुकानात ठेवलेली रोकड कशी चोरीला गेली? कारण कुठेही तोडफोड नव्हती. पण, पोलिसांनी जेव्हा बिअर शॉपचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना दिसले की, शेख राजा ऊर्फ शेख बाबा (२०) नावाच्या चोराने बिअर शॉपच्या लोखंडी खिडकीतून आत प्रवेश केला, जिथून ग्राहकांना बिअरच्या बाटल्या दिल्या जातात. अगदी अरुंद खिडकीतून तो आत शिरला आणि काउंटरमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये चोरून नेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांना चोरापर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. यावेळी चोराने या चोरीची कबुली तर दिलीच, पण तपासात असेही समोर आले की, त्याने अमरावती येथून काही दुचाकीही चोरल्या होत्या.