बँकेत चोरी करण्यासाठी चोर कधी जमिनीखाली खड्डा खोदून बँकेत शिरण्याचा प्रयत्न करतात, तर कधी दिवसाढवळ्या शस्त्रांचा धाक दाखवून बँक लुटून पळ काढतात. अनेकदा बँकेत चोरी करण्यासाठी चोर अशा काही युक्त्या शोधून काढतात की, जे पाहून पोलिसही हैराण होतात. पण, एका शहरात चोरांपासून सावध राहण्यासाठी एका बँकेने अशी भन्नाट युक्ती वापरली, जी पाहून चोरही ही चांगली बँक आहे असे म्हणून निघून गेला. ही घटना काय आहे आणि नेमकी कुठे घडली जाणून घेऊ…
सरकारी बँकांसह अनेक खाजगी बँकांबाहेर सुरक्षा रक्षक बसलेले असतात. पण, त्यांनाही न घाबरता अगदी छुप्या पद्धतीने चोर थेट बँकेत शिरतात. तेलंगणामध्ये अशाचप्रकारे एका चोरट्याने चोरी करण्यासाठी बँकेत प्रवेश केला; मात्र हाती एकही रुपया न लागल्याने तो एक चिठ्ठी लिहून निघून गेला. याच चिठ्ठीची आता खूप चर्चा होत आहे.
तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्यातील एका बँकेत चोरट्याने चोरी करण्यासाठी प्रवेश केला, पण सुरक्षेमुळे त्याला एक रुपयाही मिळाला नाही. यावेळी बँकेतील लॉकर उघडण्याचे त्याने अनेक प्रयत्न केले, पण तो पूर्णपणे अपयशी ठरला. हाती काहीच न लागल्याने त्याने एक चिठ्ठी लिहून बँकेला आपला शोध न घेण्याचे आवाहन केले. मात्र, बँकेत चोरट्याने प्रवेश केल्याची खबर मिळताच बँकेकडून पोलिसांना कळविण्यात आले.
बँकेत एक रुपयाही न मिळाल्याने चोराने लिहिली चिठ्ठी, म्हणाला….
चोरी करण्याच्या उद्देशाने चोर बँकेत शिरला, पण हाती एकही रुपया न लागल्याने चोर बँकेत एक चिठ्ठी लिहून पसार झाला. या चिठ्ठीत त्याने लिहिले की, मला एक रुपयाही मिळाला नाही… त्यामुळे मला पकडू नका. माझे बोटांचे ठसे तेथे नसतील. ही एक चांगली बँक आहे. ही चिठ्ठी आता चर्चेचे कारण ठरत आहे.
चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यावर तपासासाठी आलेल्या पोलिसांनी सांगितले की, तोंडावर कपडा गुंडाळून आलेल्या चोरट्याने गुरुवारी मुनेनेल मंडळ मुख्यालयात असलेल्या सरकारी ग्रामीण बँकेच्या शाखेच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला.
समोर आलेल्या माहितीनुसार, चोरट्याने क्लार्क आणि कॅशियरच्या केबिनमध्ये पैसे शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण एक रुपयाही सापडला नाही. जेव्हा त्याला काहीही सापडले नाही तेव्हा त्याने एक चिठ्ठी लिहून त्याचा शोध न घेण्यास सांगितले आणि बँकेच्या सुरक्षा उपायांचे कौतुक केले. संबंधित बँक ही एका निवासी संकुलात सुरू असल्याने तेथे सुरक्षा कर्मचारी नसल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी बँकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. बँकेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पण चोरीची ही अनोखी घटना ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.