Viral Video 79 year old Indian Army veteran runs food stall : निवृत्ती म्हणजे आराम, नोकरीला पूर्णविराम, असंच आयुष्य जगायचं, असं कुठे लिहिलं आहे. स्वतःच्या मर्जीनं जीवन जगण्यासाठी कोणाचंही, कुठलंच बंधन नसते. अगदी निवृत्तीनंतरही तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे घालू शकता, तुमचा छंद जोपासू शकता किंवा अगदी छोटासा व्यवसायही सुरू करू शकतात. हेच एका भारतीय लष्करातील माजी सैनिक महिलेनं सिद्ध करून दाखवलं आहे.
व्हायरल व्हिडीओ मध्य प्रदेशातील इंदूरमधील आहे. ७९ वर्षीय आजी एक साधं इडली-सांबारचं दुकान चालवतात. तर कशिश सोनी या इन्स्टाग्राम युजरनं ग्राहक म्हणून नुकतीच या दुकानाला भेट दिली. ७९ वर्षीय आजीच्या या दुकानाला भेट द्यायला गेल्यावर त्या इडली-सांबाराची प्लेट तयार करून देत होत्या. पण, हे इडली-सांबारचं दुकान सुरू करण्यामागची गोष्ट खूपच अनोखी होती. परिस्थिती किंवा त्यांची मजबुरी नाही,तर त्या आजीला या वयातसुद्धा स्वतःचं काहीतरी करण्याची आवड होती आणि हीच गोष्ट लोकांना आठवण करून देते की, निवृत्ती म्हणजे आराम नसतो.
७९ वर्षीय आजीने यापूर्वी सैन्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलं आहे. पण, निवृत्तीनंतर त्यांनी घरी बसून न राहता, स्वतः चा स्टॉल उघडला. त्यांची स्टॉल हाताळण्याची पद्धत, नीटनेटकेपणा या लष्कराची शिस्त जाणवून देणाऱ्या बाबी त्यांच्या स्टॉलवरही दिसून आल्या. हे सगळं ऐकल्यावर इन्स्टाग्राम युजरनं विचारलं, “स्वयंपाक करणं तुमचा छंद होता का?” त्यावर महिलेनं उत्तर दिलं, “फक्त स्वयंपाकच नाही, तर मी जे काही करते, ते मला मनापासून आवडतं. मला ललित कलांमध्ये पदवीसुद्धा मिळाली आहे. त्यासाठी मी एकदा मुंबईलासुद्धा गेली होती”, असे त्या स्वतःचं कौतुक करीत म्हणाल्या.
व्हिडीओ नक्की बघा…
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ७९ वर्षीय महिलेनं अजूनही लग्न केलं नाही. “लग्न केलं असतं, तर त्यांचे छंद त्या जोपासू शकल्या नसत्या”, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. इन्स्टाग्राम युजर आणि आजीमध्ये झालेला संवाद कदाचित आजीला भरपूर आवडला. त्यामुळे तिनं कशिश सोनीकडून इडली-सांबारचे पैसे घेण्यासही नकार दिला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @tasty_trekk या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आजी खूप स्ट्राँग आहेत आणि इंदूरच्या रस्त्यांवर सगळ्यांना चविष्ट पदार्थ बनवून खाऊ घालत आहेत’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून “महिला अविवाहित राहून आनंदी असतात याचे लाइव्ह उदाहरण”, “आजीकडे पाहून असं वाटतं की, तुमचं मन जे सांगेल ते करा आणि लोक काय म्हणतील याचा विचार करत राहू नका” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.