Video Shows Tamil Nadu Residents Welcome Cauvery River : भारतीय संस्कृतीत सर्व नद्यांना माता मानून, त्यांची देवी म्हणून पूजा केली जाते. अनेकदा नद्यांचे पाणी तांब्यात भरून घरात ठेवले जाते किंवा शिंपडले जाते. आता महाकुंभ मेळ्याचं उदाहरण घ्या ना. या मेळ्याचं खास आकर्षण म्हणजे गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याची संधी अनेक लोकांनी घेतली. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जे पाहून तुमच्याही डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
पहिला पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांना जसा आनंद होतो, तसाच काहीसा आनंद या व्हिडीओत दिसणाऱ्या गावातील नागरिकांना झालेला दिसतो आहे. व्हायरल व्हिडीओ तमिळनाडूतील रहिवाशांचा आहे. कावेरी नदीचे पाणी हळूहळू सुकलेल्या जमिनीवर वाहत येताना दिसले आणि स्थानिक रहिवाशांचा आनंद गगनात मावेनासा होतो. मग नदीच्या स्वागतासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसला. तेथील स्थानिक लोकांनी प्रार्थना केली, नैवेद्य दाखवला, काही जण पाण्यात हात घालून पाया पडताना दिसले, तर अनेक जण या क्षणाचा व्हिडीओसुद्धा शूट करीत होते.
निसर्ग आपल्या हृदयात खोलवर विणलेला आहे… (Viral Video)
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी तंजावर व तिरुची या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कल्लनई धरणातून कावेरी त्रिभुज प्रदेशात सिंचनासाठी पाणी सोडले. कल्लनई धरणातून सोडण्यात आलेले कावेरीचे पाणी पाहून गावकऱ्यांनी हा दिवस अगदी दिवाळी-दसऱ्यासारखा साजरा केला. कावेरी नदीचे पाणी बघताच प्रत्येकाला जणू आनंदाचे भरते आले. हवामान आणि पूर यांची अद्ययावतता शेअर करणारे तंत्रज्ञ नवीन रेड्डी यांनी हा व्हिडीओ पाहिला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एकदा बघाच हा हृदयस्पर्शी व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @navin_ankampali या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओचे वर्णन करताना त्यांनी, ‘ते फक्त पाणी नाही, तर भावना, परंपरा आणि एकता आहे’, अशी कॅप्शन दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी भारावून गेले आहेत आणि “नद्या अजूनही पवित्र घटक म्हणून पूजल्या जातात”, “कावेरी ही फक्त एक नदी नाही, तर ते पिढ्यान् पिढ्या वाहणारं संस्कृती जीवन आणि नातं आहे”, “लोक ज्या प्रकारे तिचे स्वागत करीत आहेत, त्यावरून दिसून येते की, निसर्ग आपल्या हृदयात किती खोलवर विणलेला आहे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.