Lok Sabha Election Results 2024 Watch At A Movie Theatre : देशात आज लोकसभा निवडणूक २०२४ च्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे, मतदान संपताच एक्झिट पोलचे वेगवेगळे निकाल समोर येतील. यात अनेक राजकीय विश्लेषकांकडूनही वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या निवडणुकीचे निकाल ४ जूनला जाहीर होतील, त्यामुळे राजकीय नेते आणि मतदारांचे लक्ष आता एक्झिट पोल्ससह निवडणुकीच्या अधिकृत निकालांकडे लागून आहे. अशातच या निवडणूक निकालांसंदर्भात महाराष्ट्रात एक अनोखा उपक्रम पाहायला मिळणार आहे. मतदारांना यंदा निवडणुकीचे निकाल थेट महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांमधील बड्या स्क्रिनवर पाहता येणार आहेत. अनेक चित्रपटगृहांमध्ये त्याची तयारी सुरू असून यासाठीचे बुकिंगही सुरू झाले आहे.
महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांमध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल थेट दाखवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू झाली आहे. यात मुंबईतील अनेक चित्रपटगृहांचाही समावेश आहे. चित्रपटगृहात या निवडणूक निकालांचे स्क्रीनिंग सकाळी ९ वाजता सुरू होईल, जे पुढील सहा तास चालेल.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सायन, कांजूरमार्ग, इटर्निटी मॉल ठाणे, वंडर मॉल ठाणे आणि मीरा रोडमधील मूव्हीमॅक्स तसेच कल्याणमधील एसएम५ या चित्रपटगृहांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. पण, केवळ मुंबईतच नाही तर पुणे, नाशिक, नागपूर येथील Moviemax इटर्निटी नगरमध्येही निकालाचे थेट प्रक्षेपण दाखवले जाईल.
सिनेमागृहात जाऊन निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी कसे कराल बुकिंग?
ज्याप्रमाणे पेटीएमवर आपण चित्रपटाची तिकिटे ऑनलाइन बुक करतो, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही थिएटरमध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी तिकीट बुक करू शकता. यासाठी तिकिटाची किंमत ९९ ते ३०० रुपये ठेवण्यात आली आहे. एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधित एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये पेटीएमवरून उपलब्ध तिकिटांची संख्या दर्शवण्यात आली आहे.
Maharashtra Exit Poll 2024 Live : ठाकरे वि. शिंदे, पवार वि. पवार, ‘अब की बार’ कोण बाजी मारणार?
तिकीट दर किती असेल?
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा शेवटचा टप्पा १ जून रोजी संपला. यानंतर आजपासून पुढच्या तीन दिवसांत म्हणजे ४ जून रोजी निकाल जाहीर होतील. याआधी १ जूनला संध्याकाळी एक्झिट पोलचे निकाल समोर येतील, पण लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार की इंडिया आघाडी यशस्वी होणार, याचे नेमके आणि अचूक उत्तर ४ जूनला मिळेल.
दरम्यान, या निर्णयानंतर अनेकांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले मत व्यक्त केले आहे. काही युजर्सनी म्हटले की, सिनेमागृहात चित्रपट दाखवायला नाहीत म्हणून हा आटापिटा सुरू आहे, तर काहींनी असे करून मोठा धोका पत्करत आहेत, असे म्हटले आहे. कारण निवडणुकीतील पराभवानंतर तोडफोडीच्या घटना घडू शकतात, असे म्हटले आहे.