आजकाल सोशल मीडियामुळे प्रसिद्ध मिळवणे फार सोपं झालं आहे. एक फोटो किंवा व्हिडीओसुद्धा तुम्हाला रातोरात सेलिब्रिटीसारखा लोकप्रिय करु शकतो. शिवाय यातून चांगला पैसा कमावता येत असल्याने बहुतांश तरुण याचा मोठ्याप्रमाणात वापर करत आहेत. पण या प्रसिद्धीच्या नादात काही लोक आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. एक आई आणि मुलगी रेल्वे पटरीवर उतरून इन्स्टाग्राम रिलसाठी व्हिडीओ शूट करत होत्या. पण ही गोष्ट रेल्वे पोलिसांना समजताच त्यांनी माय-लेकीला ताब्यात घेत चांगलाच धडा शिकवला आहे.
रेल्वे रुळावरून चालणे कायद्यानुसार प्रतिबंधित आहे, तरीही माय- लेकींनी रिल्स बनवण्यासाठी ही धोकादायक जागा निवडली, यावेळी जीवाची पर्वा न करता दोघी रेल्वे रुळावर उतरल्या आणि अब तेरे बिन हम मी जी लेंगे या गाण्यावर नाचू लागल्या. आई डान्स करत असताना तिची मुलगी तिचा व्हिडीओ शूट करत होती, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महिला बेधडपणे रेल्वे रुळावर नाचत होत्या हे तुम्ही पाहू शकता. अशा परिस्थितीत जर रेल्वे आली असली आणि काही अपघात झाला असता तर त्यासाठी थेट रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले असते.
ही घटना आग्रा फोर्ट रेल्वे स्थानकात घडली आहे. मीना सिंह असे व्हिडीओमध्ये नाचणाऱ्या महिलेचे नाव आहे. मीनाने तिचा व्हिडिओ यूट्यूब शॉट्समध्ये अपलोड केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आई-मुलीची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघींवर रेल्वे कायदा 145 आणि 147 अंतर्गत कारवाई करण्यात आली. पुढच्या वेळी असे करणार नाही, असे आश्वासन दोघांनी दिल्यावर पोलिसांनी त्यांना जामीन मंजूर केला.
व्हिडीओ बनवण्यासाठी रेल्वे रुळाची निवड करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकांनी रेल्वे ट्रॅकवर व्हिडीओ शूट केले आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यानंतर पोलीस कारवाई करतात पण लोक पुन्हा तिच चुक करताना दिसतात.